SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मनसेकडून हकालपट्टी होताच ‘या’ बड्या पक्षाने दिली वसंत मोरेंना ऑफर; हाती काय असेल शिवबंधन की घड्याळ?

पुणे :

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरेंच्या भूमिकेच्या विरोधात असलेल्या आणि ‘मी कुठलेही भोंगे मी लावणार नाही, मला माझ्या प्रभागात शांतता हवी आहे’, अशी भूमिका स्पष्ट आणि निर्भीडपणे घेणाऱ्या वसंत मोरे यांची मनसे शहराध्यक्ष पदावरून उचलबांगडी करण्यात आलेली आहे.

Advertisement

या घटनेला होऊन काही वेळ होताच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या पुणे राष्ट्रवादीतून वसंत मोरेंना दमदार ऑफर आलेली आहे. वसंत मोरे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत असतील तर त्यांचं पक्षात स्वागत आहे, असं राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीपूर्वी वसंत मोरे पक्षांतराचा निर्णय घेणार का, अशी चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

नुकत्याच काही दिवसांपूर्वी मनसेची बुलंद तोफ रुपाली पाटील ठोंबरे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आता सलग 15 वर्ष निवडून येणारे वसंत मोरेही राष्ट्रवादीत गेल्यावर पक्षाला त्याची झळ नक्कीच बसणार आहे. दरम्यान, पुणे महानगरपालिकेची निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. अशातच मनसेत झालेल्या उलथापालथीमुळे पक्षाला या निवडणुकीत फटका बसण्याच शक्यता आहे.

Advertisement

तरुणांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या आणखी एका नेत्याला मनसे गमावणार आहे, असेच चित्र सध्या दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात पुण्याच्या राजकारणात नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Advertisement