SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

उन्हाच्या झळानंतर अवकाळी पावसाचा बसणार झटका; पुढच्या 4 दिवसांसाठी ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई :

सोलापूरमध्ये पंढरपूर ,सांगोला ,बार्शी आणि मंगळवेढा परिसरात अवकाळीचा तडाखा बसलाय. रविवारी सायंकाळ नंतर आणि रात्री उशिरापर्यंत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसाचा द्राक्ष आणि गहू पिकाला मात्र मोठ्या प्रमाणावर दणका मिळाला. अक्कलकोट तालुक्यातील शिरवळमध्ये मुसळधार पाऊस झाला. पावसानं शेतक-यांची धांदल उडवली असली तरी हवेत गारवा निर्माण झाला आहे. सांगली शहरासह जिल्ह्याच्या काही भागात संध्याकाळी चांगला पाऊस झाला. तापमानाचा पारा 40 अंशांवर गेला असताना या पावसानं नागरिकांना काहीसा दिलासा दिला आहे.

Advertisement

आता राज्याच्या काही भागांत ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात 4 ते 7 एप्रिलच्या दरम्यान गोवा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात पाऊस बरसणार आहे. आतापर्यंत अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या मुळावर उठला असून रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात असताना पुन्हा पावसाने हजेरी लावली तर शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान होणार आहे. सोसाट्याच्या वा-यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.

पुढील 4 ते 5 दिवस राज्यातील रत्नागिरी, चंद्रपूर, गडचिरोली, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस होणार असून चा सर्वाधिक फटका आंबा फळपिकाला बसणार आहे. आता कुठे कैऱ्या वाढीस लागल्या होत्या. वाऱ्यामुळे आंबा गळती झाली तर ते न भरुन निघणारे नुकसान आहे.

Advertisement

कोल्हापूर, सातारा येथेही बुधवारपर्यंत तर सोलापूर, सांगली, अकोला, बुलडाणा, चंद्रपूर, यवतमाळ येथेही आज, मंगळवारी तुरळक ठिकाणी गडगडाटाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उन्हाळी सोयाबीनला मात्र हा पाऊस फायद्याचा आहे पण ढगाळ वातावरणामुळे यावरही कीडीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका होऊ शकतो.

Advertisement