SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

धक्कादायक : ‘त्या’ जिल्ह्यातील शेतकऱ्याने पाण्याचा घोट घेताच सोडला जीव; ठरला उष्माघाताचा बळी

उस्मानाबाद :

उन्हाळा सुरु झाला असून दिवसेंदिवस तापमान वाढत आहे. या काळात कष्टकरी आणि शेतकरी लोकांना उन्हात राबावे लागते. अशावेळी उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे कडाक्याच्या उन्हात जपून राहण्याचा प्रयत्न सगळेच करत असतात. अशातच उष्माघाताने एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आलेली आहे.

Advertisement

उस्मानाबादमधील एका शेतकऱ्याचा कडक उन्हाने बळी घेतला आहे. यापूर्वी जळगाव, अकोला भागात एका शेतकऱ्याचा उष्माघातामुळे मृत्यू झाला होता. आता उस्मानाबादमध्ये घडलेल्या घटनेने उष्माघाताने 3 बळी घेतल्याचे समोर आले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील हसेगाव येथील लिंबराज सुकाळे असं मृत शेतकऱ्याचं नाव असून शेतीतील काम आटपून घाटाघट पाणी पिल्याने त्यांना जागेवरच मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. ते 50 वर्षांचे होते. शेतातील कडबा बांधून झाल्यावर तहान लागल्याने गडबडीत पाणी पिले, पाणी पित असतानाच उष्माघातामुळे शेतातच त्यांचा मृत्यू झाला.

Advertisement

उस्मानाबादमध्ये गेल्या 6 दिवसांपासून उन्हाचा पारा वाढताना दिसत आहे. कमाल तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. त्यामुळे सूर्यापासून निघणाऱ्या अतिनील किरणांमुळे अनेकांना उष्माघाताच्या समस्या जाणवत आहेत.

Advertisement