SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आले रे आले महागाईचे अच्छे दिन आले; एलपीजी गॅसच्या दरात मोठी दरवाढ, जाणून घ्या ताजे दर

मुंबई :

पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर आता इंधन दराचा भडका उडाला आहे. इंधन, दुध अशा दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू महाग होत आहेत. अशातच आता अजून एक मोठी बातमी समोर आलेली आहे ज्यामुळे सर्वसामान्य जनतेचा खिसा कापला जाणार आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच नागरिकांना महागाईचा जोरदार झटका बसला आहे.

Advertisement

व्यावसायिक सिलिंडर पुन्हा एकदा महाग झाला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी वाणिज्य वापरातील १९ किलोच्या सिलिंडरमध्ये २५० रुपयांची वाढ केली आहे. घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किमतीत मात्र कोणताही बदल झाला नाही. तेल कंपन्यांनी 10 दिवसांपूर्वी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ केली होती, त्यावेळी या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत कमी झाली होती. आता व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांना मोठा झटका बसला आहे.

आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका बसला आहे. याशिवाय पेट्रोल आणि डिझेलच्या दर आज स्थिर असले तरीही मागील १० दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ सुरू आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०१.८१ रुपये झाला असून, डिझेलचा दर ९३.०७ रुपये आहे. तर मुंबईत पेट्रोलचा दर ११६.७२ रुपये आणि डिझेलचा दर १००.९४ रुपये आहे. आगामी काळात टप्प्याटप्प्याने पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे १२ ते २५ रुपयांपर्यंत वाढ होईल, असा इशारा विश्लेषकांनी दिला आहे.

Advertisement

नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होत असताना कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या किंमतीत 250 रुपयांची वाढ झाल्याने मुंबईमध्ये 19 किलोग्रॅमसाठीचा हा दर आता 2,205 रुपयांवर पोहोचला आहे, याआधी दर 1,955 रुपये होता. दिल्लीमध्ये कमर्शिअल गॅस सिलेंडरची किंमत 2,253 रुपयांवर पोहोचली आहे. 1 मार्च रोजी याठिकाणी दर 2,012 रुपये होता, 22 मार्च रोजी जेव्हा या दरात घसरण झाली होती त्यावेळी किंमत 2,003 रुपयांवर पोहोचली होती.

Advertisement