SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आजपासून दोन दिवस देशव्यापी भारत बंद, ‘या’ क्षेत्रांतील सेवांना बसणार सर्वाधिक फटका..

कामगार संघटनांनी आज (ता.28) आणि उद्या (ता.29) पुकारलेल्या ‘भारत बंद’ला बँक कर्मचारी संघटनांनीही पाठिंबा दिल्याने आजपासून सलग दोन दिवस बँकिंग सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे. या भारत बंदमुळे अनेक व्यवसायांवर परिणाम होऊन काही व्यवसाय बंद राहण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारच्या कामगार-कर्मचारी, शेतकरी आणि सर्वसामान्यांवर परिणाम करणाऱ्या धोरणांना विरोध करण्यासाठी कामगार संघटनांच्या महासंघाने देशव्यापी संपाची हाक दिली आहे. त्याला ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशननेही पाठिंबा दिला आहे. तसेच बँकांच्या खासगीकरणाला विरोध करण्यासाठी देशातील बँक कर्मचाऱ्यांनी आज संपाची हाक दिली आहे.

Advertisement

कामगार संघटनांच्या निवेदनात माहिती आहे की, आजपासून चालू होणाऱ्या या संपात वाहतूकदार, वाहतूक कर्मचारी आणि वीज कर्मचारीही सहभागी होतील. देशभरातील शेकडो ठिकाणी सामूहिकरीत्या रेल्वे आणि संरक्षण क्षेत्रातील कामगार संघटनाही संपाचे समर्थन करतील. कोळसा, पोलाद, तेल, दूरसंचार, टपाल, आयकर आणि विमा यांसारख्या अनेक क्षेत्रांतील कर्मचारी संपात सहभागी होण्याची अपेक्षा आहे, असे निवेदनात म्हटलं गेलंय. या संपाबाबत सूचना देणार्‍या तशा नोटिसाही त्यांना पाठवल्या आहेत. त्यामुळे या सेवांच्या निगडित सर्वच व्यवसायांवर आज परिणाम होणार असल्याचं दिसतंय. स्टेट बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँकांचे कर्मचारी आणि अधिकारी या संपात सहभागी होणार नाहीत. त्यामुळे या दोन्ही बँकांचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरळीत राहील.

वीज कर्मचाऱ्यांचाही संपाचा इशारा:

Advertisement

राज्यातील शासकीय वीज कंपन्यांमध्ये कार्यरत अभियंते, तंत्रज्ञ, कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी आणि कामगार यांनी दोन दिवस संपावर जाण्याचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ‘महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षा’ अर्थात मेस्मा कायदा लागू केला आहे. त्यानुसार संप करण्यास मनाई करण्यात आली आहे. महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण या शासनाच्या वीज कंपन्यांच्या अधिकारी-कर्मचारी यांच्या सेवा या अत्यावश्यक सेवा असल्याने या अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षा अधिनियम अर्थात मेस्मा लागू करून त्यांना संपावर जाण्यास प्रतिबंध करण्यात येत असल्याचे राज्य शासनाने राजपत्रात प्रसिद्ध आदेशात म्हटले आहे.

केंद्र सरकारच्या वीज क्षेत्राच्या खासगीकरणाच्या प्रयत्नांनाही राज्याच्या ऊर्जा विभागाने, राज्य सरकारने कडक विरोध केला आहे. संपामुळे राज्याच्या काही भागात बत्ती गुल होऊ शकते. त्यामुळे उन्हाळ्यातील वाढलेले तापमान, 10वी आणि 12वी च्या परीक्षा असल्याने, विविध पीकांना पाण्याची असलेली गरज या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला अखंड वीज पूरवठा मिळावा म्हणून वीज कंपन्यांच्या अधिकारी- कर्मचारी यांनी संपावर जाऊ नये, असे आवाहनही राज्य सरकारने केले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement