दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कोरोनाचा कहर कमी झाल्याने यंदा दहावी-बारावीच्या परीक्षा ‘ऑफलाईन’ पद्धतीने होत आहेत. खरं तर दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत यंदा सुरुवातीपासून मोठा गोंधळ पाहायला मिळाला. या परीक्षांमागे लागलेले ‘शुक्ल काष्ठ’ अजूनही संपल्याचे दिसत नाही..
यंदा दहावी-बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळेनुसार होत असल्या, तरी वेळेवर निकाल जाहीर होण्याची शक्यता फारच कमी आहे.. कारण, दहावी-बारावीच्या परीक्षा संपत आल्या, तरी शिक्षकांनी पेपर तपासणी सुरु केलेली नाही.. राज्यातील साडे सहा हजार शाळांमध्ये बोर्डाच्या पेपरचे तब्बल 1200 हून अधिक गठ्ठे धूळखात पडले आहेत.
शिक्षकांच्या मागण्या काय..?
राज्यातील विनाअनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार 100 टक्के अनुदान मिळावं, तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांना सेवा संरक्षण पुरवण्याच्या मागण्यांसाठी शिक्षकांनी आंदोलनाच्या हत्यार उपसलंय. दहावी-बारावीच्या बोर्डाच्या उत्तरपत्रिका तपासणीच्या कामावर या शिक्षकांनी बहिष्कार घातला आहे.
वास्तविक, कायम विनाअनुदानित शाळा कृतिसमितीने 24 फेब्रुवारी रोजीच आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. शिक्षकांच्या मागण्यांवर राज्य सरकारने कुठलाही निर्णय घेतला नाही. त्यामुळे सर्व शिक्षकांनी बोर्डाच्या उत्तरपत्रिका तपासण्याच्या कामास नकार दिला आहे.
निकालाला उशीर होणार..?
बोर्डाचे पेपर सुरु असतानाच, दुसरीकडे शिक्षकांचे पेपर तपासणीचे काम दरवर्षी सुरु झालेले असते. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या वा दुसऱ्या आठवड्यात दहावी-बारावीचे निकाल जाहीर होतात. मात्र, मार्च महिना संपत आला, तरी शिक्षकांनी या पेपरला हातही लावलेला नाही.
मागण्यांवर निर्णय झाल्याशिवाय पेपर तपासणार नसल्याचा इशारा कायम विनाअनुदानित शाळा कृतिसमितीने दिला आहे. त्यामुळे राज्य सरकार काय निर्णय घेते, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. शिक्षकांच्या मागण्यांवर लवकर तोडगा निघाल्यास हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.
एसटी संपाप्रमाणे शिक्षकांचे आंदोलन लांबल्यास दहावी-बारावीचे निकाल जाहीर होण्यास मोठा उशीर होऊ शकतो. अशा परिस्थितीत या विद्यार्थ्यांचे पुढील वर्षीच्या शिक्षणाचे नियोजनही कोलमडणार आहे.