SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘संप मागे घ्या, कोणाचीही नोकरी जाणार नाही…’ ठाकरे सरकारचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन..!

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. मात्र, राज्य सरकारने हे विलिनीकरण करता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या हे प्रकरण मुंबई हायकोर्टात असून, एसटी संपाबाबत आज मोठी बातमी समोर आली आहे..

एसटी संपाबाबत अधिवेशनात शासनाची भूमिका सभागृहात मांडण्याच्या सूचना विधान परिषदेचे सभापती व विधानसभा अध्यक्षांनी केल्या होत्या. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी आज (ता. 25) राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दोन्ही सभागृहांत निवेदन केलं…

Advertisement

ते म्हणाले, की “संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर आमचा कोणताही राग नाही. कोणताही आकस नाही. हे कर्मचारी विविध आमिषाला बळी पडले. त्यांच्या मनात गैरसमज पसरविले जात आहेत. 31 मार्च 2022 पर्यंत एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे. कोणाचीही नोकरी जाणार नाही, कर्मचारी कामावर आल्यानंतर त्यांच्या इतर मागण्यांबाबत चर्चा करू..”

कर्मचाऱ्यांसाठी विविध निर्णय
एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्याबाबत महत्वाचे निर्णय घेतल्याचे सांगून परब म्हणाले, की “सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 12 वरून 28 टक्के केला. घरभाडे भत्ता 7 टक्के, 14 टक्के, 21 टक्क्यांवरुन 8 टक्के, 16 टक्के व 24 टक्के केला.. कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सेवा कालावधीनुसार 5000, 4000 व 2500 अशी वाढ केली आहे.”

Advertisement

कर्मचाऱ्यांच्या वेतनात साधारणत: 7000 ते 9000 रुपये वाढ केली आहे. त्यामुळे महामंडळावर दरमहा 63 कोटींपेक्षा जादा भार पडलाय. ही पगारवाढ सातव्या वेतन आयोगाच्या जवळपास आहे. नोकरीची हमी आणि त्यांचा पगार महिन्याच्या 10 तारखेच्या आत करण्याची हमी राज्य सरकारने घेतल्याची माहिती ॲड. परब यांनी दिली.

31 मार्चपर्यंत कामावर या..
एसटी कृती समिती संघटनेच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतरही कर्मचारी संपावर ठाम आहेत. हे कामगार वेगवेगळ्या आवाहनास बळी पडले. त्यांच्या मनात गैरसमज पसरविले जात आहेत. कामगारांच्या भावनेचा उद्रेक होऊ देऊ नका. कामावर रूजू होण्यास कर्मचाऱ्यांवर कोणीही बंदी घातलेली नाही. त्यांच्यावरील कारवाया मागे घेतल्या आहेत. त्यामुळे 31 मार्चपर्यंत कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे, असे आवाहन ॲड. परब यांनी केले.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement