SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बारावीच्या विद्यार्थ्यांचे 10 गुण जाणार..? ‘या’ विषयातील प्रश्नांच्या उत्तरावरुन गोंधळ..

बारावीची परीक्षा.. म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा.. बारावीच्या मार्कांवरच विद्यार्थ्यांच्या आयुष्याची दिशा ठरत असते. त्यामुळे या परीक्षेसाठी विद्यार्थी वर्षभर दिवस-रात्र मेहनत घेत असतात. एका-एका मार्कासाठी झटत असतात.

अशातच बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.. बारावीच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना 10 गुण गमावावे लागण्याची शक्यता आहे. विज्ञान शाखेतील जीवशास्र विषयाच्या परीक्षेतील बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे कशी लिहिली गेली आहेत, त्यावर हे 10 गुण अवलंबून आहेत. नेमकं काय झालंय, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

नेमकं कारण काय..?
बारावी विज्ञान शाखेतील जीवशास्राच्या परीक्षेत पहिल्या प्रश्नामध्ये 10 गुणांसाठी बहुपर्यायी प्रश्न विचारले होते. या प्रश्नांची उत्तरे लिहिताना विद्यार्थ्यांनी केवळ पर्याय लिहिला असल्यास, (a,b,c किंवा d यापैकी एक), अथवा फक्त उत्तर लिहिले असेल तर, किंवा पूर्ण वाक्यात उत्तर लिहून त्यात पर्याय (a, b, c किंवा d यापैकी एक) लिहिला नसेल, तर शून्य गुण मिळणार आहेत. तशा सूचना परीक्षक व नियामकांना देण्यात आल्या आहेत.

पूर्ण वाक्यात उत्तर लिहून त्यात पर्याय लिहिला असेल, तरच या प्रश्नांसाठी मार्क मिळणार आहेत.. याबाबत महाविद्यालयांना सूचना देण्यात आल्या असून, या मार्कांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नियामकांना दिला आहे. दुसरीकडे रसायनशास्र व भौतिकशास्र विषयांतील बहुपर्यायी प्रश्नांबाबत अशा कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे जीवशास्र विषयाबाबत नेमकं काय करावं, असा प्रश्न परीक्षक आणि नियामकांनाही पडला आहे.

Advertisement

विद्यार्थी हवालदिल..
दरम्यान, कोरोनामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयांमध्ये जाऊन अभ्यास करता आलेला नाही. त्यामुळे बारावीचे पेपर तपासताना कठोर होऊ नये, अशी सूचना शिक्षण मंडळाने नियामकांना दिल्या आहेत. मात्र, जीवशास्र विषयाच्या मुख्य नियामकांच्या बैठकीत बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे लिहिण्याची पद्धत चुकीची असल्यास गुण न देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जीवशास्र विषयाचा पेपर लिहिताना बहूपर्यायी प्रश्नांची उत्तरे कशा पद्धतीने लिहिली जावीत, याबाबत कॉलेजमधून विद्यार्थ्यांना काहीच सांगण्यात आले नाही. त्यामुळे हा सगळा गोंधळ निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, नाहक 10 गुण गमावण्याची वेळ आल्याने, विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement