SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

राज्यात तलाठ्यांच्या 3165 जागांसाठी भरती, राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय..!

राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी आहे. राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून तलाठ्यांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे महसूल यंत्रणेवर ताण येत आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने राज्यात लवकरच तलाठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नुकतीच विधानसभेत ही माहिती दिली. ते म्हणाले, की राज्यात लवकरच तलाठ्यांची 3165 पदे भरण्यात येणार आहेत. या पदभरतीसाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, पहिल्या टप्प्यात एक हजार तलाठ्यांची भरती (Talathi recruitment) केली जाणार आहे.

Advertisement

सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. त्यात अ‍ॅड. अशोक पवार व भीमराव तापकीर यांनी लक्षवेधी  मांडली होती. त्यात पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्याचे विस्तारीकरण, नागरीकरण आणि विकास लक्षात घेता प्रशासकीय यंत्रणा तोकडी पडत असल्याचा मुद्दा मांडला होता. त्याला उत्तर देताना, महसूलमंत्री थोरात बोलत होते..

थोरात काय म्हणाले..?
ते म्हणाले, की राज्यात मोठ्या प्रमाणात तलाठ्यांची जागा रिक्त आहेत. त्यामुळे सध्याच्या महसूल कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येतो. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने राज्यात तलाठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात तलाठ्यांची 3165 पदे भरली जाणार असून, त्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात एक हजार तलाठ्यांची भरती केली जाईल.

Advertisement

हवेली तालुक्यात 160 गावांचा समावेश असून, अंदाजे 40 लाख लोकसंख्या आहे. वाढते शहरीकरण, वाढत्या प्रशासकीय कामकाजामुळे लोणी काळभोर येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याचा विचार सुरु आहे. या प्रस्तावावर शासन सकारात्मक निर्णय घेईल, अशी ग्वाही मंत्री थोरात यांनी दिली.

दरम्यान, गावांचे अर्थकारण अन् मालमत्ताचा लेखाजोखा ठेवण्याचे काम तलाठी करीत असतो. महसूल नोंदी व कर वसुली, सात-बारा उतारा देण्यासह ऑनलाईन कामकाज, अवैध गौण खनिजविरोधातील कारवाई आदी कामे तलाठी करतो. संजय गांधी निराधार योजना, निवडणुक, पुरवठा विभाग, पिकांसह विविध पंचनामे, सर्वेक्षणाची कामेही तलाठ्यालाच करावी लागतात.

Advertisement

अनेक ठिकाणी 3 ते 4 गावांसाठी एकच तलाठी असल्याने, या साऱ्या कामाचा ताण त्यांच्यावर येतो. शिवाय, शासनाच्या विविध योजनांपासून नागरिकही वंचित राहतात. मात्र, आता तलाठी भरती होणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे..

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement