SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

यंदा शाळांना उन्हाळ्याची सुटी नाही, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबतही मोठा निर्णय..!

उन्हाळा म्हटलं की विद्यार्थ्यांना वेध लागतात ते सुटीचे.. परीक्षा संपलेल्या असतात नि चिमुकल्यांची मामाच्या गावाला जाण्याची तयारी सुरु झालेली असते.. तर घरातील मोठ्यांचे कुठे तरी ‘ट्रीप’चे नियोजन चालले असते.. यंदाही तुम्ही असंच काहीसं नियोजन करीत असाल, तर थांबा.. कारण, राज्य सरकारने उन्हाळी सुट्ट्यांबाबत मोठा निर्णय घेतलाय..

कोरोनामुळे गेली दोन वर्षे शाळांना टाळे लागलेले होते. या काळात विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण झाले.. मात्र, या शिक्षणात अनेक मर्यादा होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झालं.. आता कोरोनाची स्थिती सुधारली असून, रुग्णसंख्या आटोक्यात आलीय. जनजीवन पुर्वपदावर आलंय..

Advertisement

कोरोनाचा धोका कमी झाल्याने काही दिवसांपूर्वी शाळा-महाविद्यालये सुरु करण्यात आली होती. दहावी-बारावीच्या परीक्षाही ऑफलाईन पद्धतीने सुरु आहेत. पहिली ते नववीचे वर्ग सुरु आहेत. हे वर्ग आता 100 टक्के उपस्थितीसह सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने परवानगी दिलीय. तसे परिपत्रक गुरुवारी (ता. 24) जारी करण्यात आले..

शनिवारी-रविवारीही शाळा
उन्हाळ्याची चाहूल लागताच दरवर्षी मार्चमध्येच सकाळच्या सत्रात शाळा भरण्यास परवानगी दिली जाते. मात्र, यंदा पूर्ण वेळ शाळा सुरू ठेवाव्यात, तसेच शनिवारीही पूर्ण वेळ शाळा भरण्याचा आदेश देण्यात आला आहे. शिवाय, रविवारीही ऐच्छिक स्वरूपात शाळा सुरू ठेवण्यास शालेय शिक्षण विभागाने परवानगी दिली आहे.

Advertisement

मार्चमध्ये परीक्षा संपून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्या मिळत. मात्र, यंदा संपूर्ण मार्च व एप्रिल महिन्यातही पूर्ण वेळ शाळा असणार आहे. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना एप्रिलमध्ये उन्हाळ्याची सुटी मिळणार नाही. कोरोनामुळे मागे राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना एप्रिलमध्येही शाळेत यावं लागणार आहे.

कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी शाळांना काही विशेष सोयी कराव्या लागण्याची शक्यता आहे. मात्र, यंदा विद्यार्थ्यांचा उन्हाळी सुटीचा महिना अभ्यासात जाणार, हे नक्की..!

Advertisement

परीक्षा व निकाल कधी..?
पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात घ्याव्यात, तर हा निकाल मे महिन्यात जाहीर करण्याचा आदेश शालेय शिक्षण विभागाने दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा संपूर्ण एप्रिल महिना हा शाळा, अभ्यास आणि परीक्षांमध्ये जाणार आहे.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement