SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘आयपीएल’ स्पर्धा दहशतवाद्यांच्या ‘हिटलिस्ट’वर..? मुंबई पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती..

‘इंडियन प्रीमियर लिग,’ अर्थात ‘आयपीएल’च्या 15व्या पर्वास येत्या 26 मार्चपासून सुरुवात होत आहे. लिगमधील सगळे 70 सामने पुण्या-मुंबईतच खेळविले जाणार आहेत. या स्पर्धेसाठीची सगळी तयारी पूर्ण झाली आहे, सर्व टीमचे खेळाडू, कोचिंग स्टाफ मुंबईत दाखल झाला आहे..

‘आयपीएल’ स्पर्धा (IPL-2022) दोन दिवसांवर आलेली असताना, एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे, यंदाची ‘आयपीएल’ स्पर्धा दहशतवाद्यांच्या ‘हिटलिस्ट’वर असल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे. याबाबत खुद्द मुंबई पोलिसांनीच माध्यमांना माहिती दिली.

Advertisement

‘आयपीएल’ दहशतवाद्यांच्या निशाण्यावर
मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, याप्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) एका आरोपीला अटक केलीय. अटक करण्यात आलेल्या या दहशतवाद्यानं वानखेडे स्टेडिअम, नरिमन पॉईंटचे ट्रायडंट हॉटेल, तसेच खेळाडूंचे हॉटेल ते स्टेडिअमपर्यंतच्या मार्गाची रेकी केल्याची कबुली दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

‘आयपीएल’ स्पर्धा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची बाब समोर आल्यानंतर सगळी स्टेडिअम, तसेच खेळाडूंचा मुक्काम असलेल्या हॉटेलच्या सुरक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. सामनाधिकारी, अंपायर, तसेच अन्य कर्मचाऱ्यांनाही सुरक्षा पुरवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

मुंबई पोलिस ‘हाय अलर्ट’
‘आयपीएल’ मॅच सुरु असताना, खेळाडूंच्या हॉटेलपासून स्टेडियमपर्यंतच्या मार्गावर ‘नो पार्किंग’ लागू केलं असून, येथील सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. तसेच, कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी शीघ्र कृतिदल, बॉम्बशोधक पथक व मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाला तैनात राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई पोलीस सध्या ‘हाय अलर्ट’वर आहेत.

दरम्यान, येत्या 26 मार्चपासून ‘आयपीएल’ स्पर्धेला सुरुवात होत असून, 22 मेपर्यंत लिगमधील 70 सामने महाराष्ट्रातच होणार आहेत. या संपूर्ण कालावधीमध्ये खेळाडू, तसेच ‘आयपीएल’ संबंधित सर्व लोकांसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था देणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

Advertisement

 

Advertisement