SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘आयपीएल’ चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी, ठाकरे सरकार महत्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत..!

जगभरात कोरोनाची चौथी लाट आल्याचे चित्र आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाचा ‘ओमायक्राॅन’ व्हेरियंट तुफान वेगाने फैलावत असून, त्यामुळे पुन्हा एकदा शहरे लाॅकडाऊन करण्याची वेळ आली आहे. सध्या भारतात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असली, तरी जगभरातील परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने राज्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीग.. अर्थात आयपीएलच्या 15 व्या पर्वाला (IPL- 2022) येत्या 26 मार्चपासून सुरुवात होत आहे. स्पर्धा जसजशी जवळ येतेय, तसतशी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. मात्र, क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. त्यामुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे.

Advertisement

यंदाची ‘आयपीएल’ 25 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत खेळवली जाणार असल्याचे आधी सांगण्यात आले होते. मात्र, कोरोनाचा धोका लक्षात घेऊन ठाकरे सरकार हा निर्णय मागे घेणार असल्याचे खात्रीलायक वृत्त समोर येत आहे. त्यामुळे यंदाची ‘आयपीएल’ प्रेक्षकांशिवाय खेळवली जाण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षीही प्रेक्षकांविना
गेल्या वर्षीही ‘आयपीएल-2021’ला भारतात प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात आली होती. मात्र, नंतर अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने हा हंगाम मध्येच थांबवावा लागला. त्यानंतर काही महिन्यांनंतर संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) उर्वरित सामने खेळवण्यात आले होते.

Advertisement

दरम्यान, यंदा ‘आयपीएल’चे सगळे 70 साखळी सामने महाराष्ट्रातील पुण्या-मुंबईत होणार आहेत, प्ले ऑफ लढतींबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. यंदा 25 टक्के प्रेक्षकांसह स्पर्धा खेळवण्याचे नियोजन ‘आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिल’ व ठाकरे सरकारने केले होते. मात्र, आता प्रेक्षकांना स्टेडियममध्ये जाता येणार नसल्याचे वृत्त समोर आले आहे.

युरोपियन देश, दक्षिण कोरिया व चीनमध्ये कोरोना रुग्णसंख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य विभागाने राज्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. ‘आयपीएल’ सामन्यांतील प्रेक्षकांच्या उपस्थितीबाबत आताच काही बोलता येणार नसल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी दिली.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement