SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

महेंद्रसिंग धोनी ‘7’ नंबरचीच जर्सी का घालतो..? खुद्द धोनीचेच केला धक्कादायक खुलासा..!

‘कॅप्टन कुल’ अर्थात भारतीय क्रिकेट संघाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी.. टीम इंडियाने धोनीच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत 3 वेळा ‘आयसीसी ट्रॉफी’ जिंकलीय.. शिवाय ‘आयपीएल’मधील ‘सीएसके’ संघालाही त्याने आतापर्यंत 4 वेळा विजेतेपद मिळवून दिलंय.. त्यामुळेच माहीचे भारतासह जगभरात मोठ्या संख्येने फॅन्स आहेत..

धोनीचे नाव समोर आले, की एक नंबर सतत डोळ्यांना खुणावतो, तो म्हणजे 7.. धोनीने 2004 मध्ये बांग्लादेशविरुद्ध 7 नंबरची ‘जर्सी’ घालून भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होतं. त्यावेळी क्रिकेटमध्ये 7 नंबरची जर्सी कोणीच घालत नव्हतं. फुटबॉलमध्ये डेव्हिड बेकहॅम, राऊल, क्रिस्टियानो रोनाल्डो सारख्या दिग्गज खेळाडूंनी 7 नंबरची जर्सी परिधान केलीय.

Advertisement

धोनी कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच 7 नंबरची ‘जर्सी’ घालूनच खेळला. आता तर 7 हा नंबर इतका प्रसिद्ध झाला, की आज अनेकांच्या टी-शर्टवर हाच नंबर दिसतो.. मात्र, ‘जर्सी’वर 7 नंबरच का, दुसरा का नाही, असा प्रश्न धोनीच्या चाहत्यांसह अनेकांना पडला होता.. आता खुद्द धोनीनेच याबाबत खुलासा केलाय..

धोनीने रहस्य उलगडले..
चेन्नई सुपर किंग्जची मालकी असलेल्या इंडिया सिमेंट्सतर्फे आयोजित व्हर्च्युअल संभाषणात धोनीने तो 7 नंबरची जर्सी का घालतो, याचे रहस्य उघड केले.

Advertisement

धोनी म्हणाला, “बर्‍याच लोकांना सुरुवातीला वाटले, की 7 हा माझ्यासाठी लकी नंबर आहे. मात्र, त्यामागे अतिशय साधे कारण आहे. माझा जन्म 7 जुलै रोजीचा आहे. सातव्या महिन्यातील सातवा दिवस. त्यामुळेच कोणता नंबर चांगला, हे पाहण्याऐवजी मी माझी जन्मतारीख ‘जर्सी’चा नंबर म्हणून निवडली.”

“लोक मला या नंबरबद्दल सतत विचारत होते. त्यामुळे मी त्या उत्तरात भर घालत राहिलो. 7/7 आणि नंतर जन्मवर्ष 1981 आहे. 8 मधून 1 वजा केल्यास उत्तर 7 येते. हा एक नॅचरल नंबर आहे. लोक मला जेव्हा हा प्रश्न विचारतात, तेव्हा मी त्या वेळेनुसार उत्तर देतो. 7 ही नैसर्गिक संख्या आहे. ती तुमच्यासाठी काम करीत नसेल, तरी ती विरोधात जात नाही. म्हणून मी माझ्या उत्तरात तेही जोडले. मी नंबरबाबत खूप अंधश्रद्धाळू नाही, परंतु हा माझ्या मनाच्या जवळचा हा नंबर आहे, म्हणून तो मी माझ्याजवळ ठेवतो..” असंही धोनी म्हणाला.

Advertisement

दरम्यान, येत्या 26 मार्चपासून ‘आयपीएल’च्या 15 व्या पर्वाला सुरुवात होत आहे. धोनीसाठी ही अखेरची स्पर्धा असल्याचे बोलले जात आहे. त्यादृष्टीने गतविजेत्या ‘सीएसके’ने धोनीच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा संघाचा सराव सुरू केला आहे. या हंगामातही ‘सीएसके’ उद्घाटनीय सामना खेळणार आहे. 26 मार्चला ‘सीएसके’चा मुकाबला कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement