SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दुधाचा भाव ‘एवढ्या’ रुपयांनी वाढला, ग्राहकांना भुर्दंड तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा..!

देशात इंधन दरवाढीसोबत अनेक गोष्टींचे भाव वाढले आहे. आता दुधाच्या खरेदीत तीन रुपये तर विक्री दरात दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. राज्यभर गाईच्या दूध खरेदी आणि विक्री दरात प्रतिलिटर प्रत्येकी तीन आणि दोन रुपयांची दरवाढ करण्याचा निर्णय राज्यातील सहकारी व खासगी दूध उत्पादक संघांकडून घेण्यात आला आहे. दुध पावडर व बटरचे वाढलेले दर, वाढती मागणी व कमी उत्पादन, पशुखाद्य, इंधन दरवाढीमुळे शेतक-यांना दूध व्यवसाय करण्यासाठी खर्चही जास्त येत असल्याने ते परवडत नसल्याने शेतक-यांना अडचणीचे ठरत आहे. म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

दूध दरवाढीमुळे ग्राहकांना जरी भुर्दंड सोसावा लागत असला तरी शेतकऱ्यांना मात्र कधीतरीच भाववाढ मिळत असल्याने, यंदाच्या महागाईच्या काळात आणि कोरोनाच्या काळातही पशुखाद्य, वैरणीचे दर वाढलेले असताना शेतकऱ्यांना गुरांचे पालन करण्यासाठी चारा आणि दूध वाहतुकीचा हा खर्च इंधन दरवाढीमुळे परवडत नसल्याने ही भाववाढ केल्याचे समजत आहे.

Advertisement

आता ग्राहकांना किती पैसे मोजावे लागणार..?

ग्राहकांना दूध खरेदी करताना एक लिटर दूधामागे आता यापुढे दोन रुपये जास्त द्यावे लागणार आहेत. तर शेतकऱ्यांकडून जे दूध संघ दूध खरेदी करतात, त्या शेतकऱ्यांना तीन रुपये प्रतिलिटर वाढवून द्यावा लागणार आहे. कोरोनामुळे शेतकऱ्यांना गायीच्या दुधाला अपेक्षित दर मिळाला नाही. या आणि वरील सर्व बाबींचा विचार करून गायीच्या 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ गुणप्रतिच्या दुधाच्या दरात तीन रुपये वाढ करीत हा दर 30 वरून 33 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisement

बैठकीत झालेल्या या नव्या निर्णयामुळे आता गाईच्या दुधाचा एक लिटरचा खरेदी भाव 33 रुपये तर, पिशवीबंद दुधाचा किरकोळ विक्री दर प्रतिलिटर 52 रुपये असणार आहे. या दूध दरवाढीच्या निर्णयाची अंमलबजावणी काल 15 मार्चपासून केली आहे.

दूध पावडर व लोणी यांचे वाढलेले दर यामुळे दूधाची वाढती मागणी व कमी उत्पादनामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. वीज, पॅकेजिंग, लॉजिस्टिक आणि चारा यांच्या वाढत असेल्या दरामुळे भाववाढ केल्याची कात्रज डेअरीचे कार्यकारी संचालक विवेक क्षीरसागर यांनी सांगितलं.

Advertisement

राज्य दूध उत्पादक प्रक्रिया व व्यावसायिक कल्याणकारी संघाची बैठक सोमवारी (दि.14) रात्री झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी गोपाळराव म्हस्के होते. बैठकीला महानंद, चितळे, गोवर्धन, गोविंद, ऊर्जा, सोनाई, शिवप्रसाद, नेचर डिलाईट, रिअल डेअरी एस. आर. थोरात, शिवामृत, कात्रज, राजहंस, स्फुर्ती, अनंत, संतकृपा, सुयोग इत्यादी सहकारी व खाजगी दूधव्यावसायिकांचे अंदाजे 55 सभासद उपस्थित होते. या बैठकीत गायीच्या दूध खरेदीसह विक्री दरातही वाढ करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement