SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘झुंड’ सिनेमा मराठीत का नाही केला..? नागराज मंजुळेंनी सांगितली खरी अडचण…!

गेल्या काही दिवसांत एका चित्रपटाची जोरदार चर्चा आहे.. तो म्हणजे, ‘झुंड’.. नागराज मंजुळे या हरहुन्नरी, अभ्यासू दिग्दर्शकाचा हा पहिला-वहिला हिंदी सिनेमा.. गेल्या 4 मार्च रोजी ‘बडी फिल्म बडे पडदे पर..’ असे म्हणत सिनेमागृहात प्रदर्शित झाला. बाॅक्स ऑफिसवरही हा सिनेमा चांगला चालला आहे. समीक्षकांकडूनही त्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक होतेय..

नागराज मंजुळे यांनी याआधी ‘फॅन्ड्री’, ‘सैराट’ सारखे दर्जेदार सिनेमे मराठी इंडस्ट्रीला दिले आहेत.. ‘झुंड’ हा त्यांचा हा पहिलाच हिंदी सिनेमा.. त्यात त्यांनी बाॅलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना मुख्य भूमिकेत घेताना अर्धी बाजी तिथंच मारली.. अर्थात इथेही नागराजच्या सिनेमाचा हिरो ‘कथा’च आहे..

Advertisement

‘झुंड’ या सिनेमातून नागराजन यांनी समाजातील वंचित घटकांच्या समस्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विजय बारसे नावाच्या फुटबॉल प्रशिक्षकांचे नाव किती लोकांना माहित होतं? मात्र, नागराज यांच्या सिनेमामुळे हे नाव, त्यांचा संघर्ष, एक चांगले कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे.

मराठीत ‘झुंड’ का नाही..?
दरम्यान, आतापर्यंतचे सगळे सिनेमे मराठीत असताना, ‘झुंड’ हिंदीतच का, मराठीत का नाही केला, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. याबाबत खुद्द नागराज मंजुळे यांनीच नुकतेच उत्तर दिले.

Advertisement

ते म्हणाले, की “आपण वेगवेगळ्या पातळ्यांवर पाहत असतो. हे असं का केलं, तसं का नाही.. एक गोष्ट केली, तर दुसरी का केली नाही..? दुसरी केली, तर तिसरी का नाही, असा एक आपला अॅप्रोच असतो.. त्यामुळे मला जे करायचं होतं, ते मी करतोय.. झुंड सिनेमा मराठीत का केला नाही, तर बच्चन साहेब असल्याने हा चित्रपट हिंदीत असणं स्वाभाविक होतं..”

“मराठीत ही फिल्म डब करायला पाहिजे होती किंवा मराठीतही रिलिज करायला पाहिजे होती किंवा अजूनही तेलगू, तमिळमध्ये रिलिज करायला हवी होती, असं मला खूप पहिल्यापासून वाटतंय..पण काही मर्यादा असतात.. फिल्मच्या, प्राॅडक्शनच्या.. आम्ही 3 वर्षे या फिल्मसाठी थांबलो, तर अजून निवांतपणे थांबून हे करायला पाहिजे होते..पण नाही होऊ शकलं.. मात्र, माझ्या डोक्यात आहे ते.. यापुढे अनेक भाषांत फिल्म रिलिज व्हावी, यासाठी प्रयत्न करु,” असे नागराज म्हणाले..

Advertisement