SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘आरसीबी’च्या कर्णधारपदी ‘या’ दिग्गज खेळाडूची निवड, विराटने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया..!

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. ‘आयपीएल’मधील ‘राॅयल चॅलेंजर्स बंगळुरु’ अर्थात ‘आरसीबी’च्या कॅप्टन पदाचा तिढा अखेर सुटलाय.. भारताचा स्टार खेळाडू, माजी कॅप्टन विराट कोहलीने ‘आरसीबी’च्या कॅप्टन पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याच्या जागी कोणाची निवड होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते..

विराट कोहलीने गेल्या वर्षीच ‘आरसीबी’च्या कॅप्टन पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. ‘आरसीबी’साठी कर्णधार म्हणून ‘IPL-2021’ हा शेवटचा हंगाम असल्याचे विराटने जाहीर केले होते. विराटने राजीनामा दिल्यानंतर नवा कर्णधार कोण होणार, याची उत्सुकता लागली होती. अखेर त्याचे उत्तर आज (शनिवारी) मिळालं.

Advertisement

विराट कोहलीच्या जागी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने (Royal Challengers Bangalore) दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) याची निवड केलीय. ‘आयपीएल’च्या यंदाच्या 15 व्या हंगामात (IPL-2022) तो ‘आरसीबी’चे नेतृत्व करताना दिसेल.. बंगलोर संघाने ट्विटरवर अधिकृतरित्या त्याच्या नावाची घोषणा केली.

‘आरसीबी’चा सातवा कर्णधार
‘आरसीबी’चे नेतृत्व करणारा फाफ डू प्लेसिस सातवा कर्णधार असेल.. यापूर्वी विराट कोहली, शेन वॉटसन, डॅनियल व्हिटोरी, अनिल कुंबळे, केविन पीटरसन व राहुल द्रविड यांनी बंगलोर संघाची कमान सांभाळलीय. अर्थात त्यात सर्वाधिक तब्बल 10 हंगामात बंगलोर संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी विराटवर होती. मात्र, त्याला एकदाही विजेतेपद मिळवता आले नाही.

Advertisement

दक्षिण आफ्रिकेचा 37 वर्षीय हा स्टार खेळाडू बऱ्याच काळापासून ‘चेन्नई सुपर किंग्ज’चा (सीएसके) भाग होता, पण ‘सीएसके’ने त्याला रिटेन केले नव्हते. ‘आयपीएल’च्या ‘मेगा ऑक्शन’मध्ये ‘आरसीबी’ने त्याला 7 कोटी रुपयांत आपल्या संघात घेतले.

‘आयपीएल’मध्ये फाफ डू प्लेसिस पहिल्यांदाच एखाद्या संघाचे नेतृत्व करीत आहे. शिवाय प्रथमच तो कॅप्टन कुल एम. एस. धोनीशिवाय खेळणार आहे. ‘आयपीएल’मध्ये तो 100 सामने खेळला असून, 34.94 च्या सरासरीने 2935 धावा केल्या आहेत. आयपीएल स्पर्धेत त्याने आतापर्यंत 22 अर्धशतके झळकावली आहेत.

Advertisement

विराट काय म्हणाला..?
‘आरसीबी’च्या कर्णधारपदी फाफ डू प्लेसिसची नियुक्ती झाल्यानंतर माजी कर्णधार विराटने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, की “मागील इतकी वर्षे जी जबाबदारी माझ्या खांद्यावर होती, ती आता फाफ डू प्लेसिसवर सोपवून मी आनंदी आहे. तो माझ्या चांगल्या आणि जवळच्या मित्रांपैकी एक आहे. आमच्यात केवळ मैदानावरच नाही, तर मैदानाबाहेरही चांगले नाते आहे. मी त्याच्या नेतृत्त्वाखाली खेळण्यासाठी उत्साहित आहे..”

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement