SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पीएम किसान योजनेसाठी ‘ई-केवायसी’ करण्यात अडचणी, शेतकऱ्यांपुढे आहेत ‘हे’ पर्याय..

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना.. मोदी सरकारची एक महत्वाकांक्षी योजना.. या योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांना 10 हप्ते मिळाले असून, लवकरच या योजनेचा 11वा हप्ता मिळणार आहे..

गेल्या काही दिवसांत या योजनेत बोगस शेतकऱ्यांचा सुळसुळाट झाला. अनेक अपात्र लोकांनी योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले होते. त्यानंतर अशा बोगस शेतकऱ्यांकडून या रकमेची वसुलीही सुरु करण्यात आली आहे.. यापुढील काळात खऱ्या शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळावा, यासाठी नियमांत बदल करण्यात आले आहेत..

Advertisement

येत्या एप्रिलमध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Yojana) 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, हा हप्ता मिळवण्यापूर्वी शेतकऱ्यांना 31 मार्चपूर्वी ‘ई-केवायसी’ करावी लागणार आहे. ‘ई-केवायसी’ न करणाऱ्या शेतकऱ्यांना 11वा हप्ता मिळणार नसल्याचे सांगण्यात येते..

दरम्यान, ‘ई-केवायसी’ करण्यासाठी शेतकऱ्यांकडे फक्त 20 दिवसांचाच अवधी शिल्लक आहे. त्यात ‘ई-केवायसी’ करण्यात शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामाेरे जावे लागत आहे. ‘ई-केवायसी’ची (e-kyc) प्रक्रिया ही ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष ‘सीएससी’ केंद्रावर करावी लागणार आहे. अनेक शेतकरी ‘सीएससी’ केंद्रावरच ही प्रक्रिया करीत आहेत.

Advertisement

शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी
‘ई-केवायसी’साठी या सेंटरवर शेतकऱ्यांना तास न् तास बसावे लागते. कधी वेबसाईट जाम होते, तर कधी मध्येच बंद पडते. शेतकऱ्यांच्या हाताचे ठसे उमटत नसल्याने ‘केवायसी’ होत नाही. ‘ई-केवायसी’साठी आवश्यक असलेले बायोमेट्रिकही बंद आहेत.

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 11वा हप्ता मार्चनंतर कधीही मिळू शकतो. त्यामुळे महसूल व कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी हे गावोगाव सर्वे करणार आहे. शेतकऱ्यांना मुदतीत ‘ई-केवायसी’ करण्यासाठी अडचणींवर तोडगा काढण्याची मागणी होत आहे.

Advertisement

शेतकऱ्यांपुढे पर्याय काय..?
शेतकऱ्यांना 31 मार्चपूर्वी ई-केवायसी करावी लागणार आहे.. मात्र, स्थानिक पातळीवर अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांपुढे काय पर्याय आहेत, याबाबत जाणून घेऊ या..

  • शेतकऱ्यांना www.pmkisan.gov.in या वेबसाईटवर ‘ई-केवायसी’ करता येईल. ही वेबसाइट ओपन करा. त्यावर तुम्हाला लाल अक्षरांत ‘पीएम किसान योजनेसाठी ‘केवायसी’ करणे बंधनकारक’ असल्याची सूचना दिसेल.
  • ‘केवायसी’साठी दोन पर्याय आहेत. एक म्हणजे फोन नंबर व आधार कार्डला लिंक असल्यास तुम्ही आधार नंबरच्या साहाय्याने ‘केवायसी’ करू शकता.
  • संकेतस्थळावर त्यासाठी ‘फार्मर कॉर्नर’वर क्लिक करा. नंतर ‘आधार केवायसी’ नावाचे पेज समोर येईल. त्यात सुरुवातीला आधार क्रमांक, नंतर समोरच्या बॉक्समधील अक्षरे व अंक, जसेच्या तशी टाकायची आहेत.
  • नंतर ‘search’ या पर्यायावर क्लिक करा. तुमच्यासमोर आधार नंबर दिसेल, त्यानंतर आधार कार्डला लिंक असणाराच मोबाईल नंबर टाकावा. नंतर ‘Get Otp’वर क्लिक करा.
  • मोबाईलवर आलेला ओटीपी भरुन ‘submit for Auth’वर क्लिक केले, की तुमचे ई-केवायसी पूर्ण होणार आहे.
  • ई-केवायसी अयशस्वी झाल्यास किंवा ‘invalid’ पर्याय आल्यास ‘सीएससी’ केंद्रावर जावे.
  • आधार कार्ड जर मोबाईल नंबरला लिंक केलेला नसेल, तर ‘सीएससी’ केंद्रावर कागदपत्रे देऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement