SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

राज्यातील ‘या’ भागाला पावसासह गारपिटीचा सर्वाधिक फटका, आजचा हवामान खात्याचा अंदाज वाचा..

सध्या राज्यात हिवाळा संपल्यानंतर उन्हाळ्यास सुरुवात झाली आहे. परंतु राज्यातील काही भागात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पावसाचे वातावरण दिसत आहे. हवेत गारवा आहे. तसेच दुपारी गरम वातावरणदेखील होत आहे. काही महिन्यांपूर्वी देखील असेच सततच्या बदलणाऱ्या वातावरणामुळे सर्दी, ताप, घसा दुखणे असे आजार उद्भवू लागले होते. आता पुन्हा वातावरणात बदल झाले असता हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे.

हवामान खात्याच्या आजच्या अंदाजानुसार..

Advertisement

सध्या येत्या तीन चार तासांमध्ये तर दिवसभरात अहमदनगर, बीड ,सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यात काही ठिकाणी वादळ वारे येण्याची शक्यता असून 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे व वादळी वाऱ्यासह पाऊसही पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातला शेतकरी त्रस्त आहे. सध्या अशा खराब वातावरणामुळे बाहेर जात असाल तर खबरदारी घेऊनच बाहेत पडा. अशा सूचना देऊन याबाबतची माहिती हवामान खात्याच्या मुंबई विभागाकडून देण्यात आलेली आहे.

Advertisement

राज्यात अवकाळी पावसामुळे आता हरभरा, कांदा पिकांचे अतिशय जास्त नुकसान झाले आहे. तर नाशिकमधील बहुतांश द्राक्ष बागांनाही मोठा फटका बसला आहे. याशिवाय महत्वाचं म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यामध्ये बोपखेल-चरणमाळ घाटात चांगलीच गारपीट झाली, काल रात्री 1 ते 1.30 तास पाऊस झाला आणि शेतकऱ्यांचे त्यात प्रचंड नुकसान झाले आहे.

नुकसानग्रस्त भागाविषयी बोलायचं झालं, तर नवापुर तालुक्यातील बोरझर, चरणमाळ, प्रतापपूर तसेच धुळे जिल्ह्यातील बोपखेल, वारसा ,उमरपाटा, कुडाशी, मांजरी, शेंदवड, नांदुरकी, पिंपळनेर पश्चिम पट्ट्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. ही गारपीट एवढ्या प्रमाणात झाली की शेतकऱ्यांचे कांदा, गहू, हरभरा, भुईमूग, ज्वारीचे पीक झोपून गेल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गारपीट आणि पावसामुळे हिरावून गेलाय.

Advertisement

कोकणातही आंबा -काजूचं झालं नुकसान

राज्यातील पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा समजला जाणारा कोकण भाग पावसाने व गारपीटीने पिंजून निघाला. तळकोकणात पाऊस व गारपीटही झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली कणकवली फोंडा भागात वादळी वाऱ्यासोबतच गारांचा पाऊस झाला. वातावरण भयानक झाले होते. जवळपास अर्धा तास ढगांचा गडगडाट चालू होता. या अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू पिकाचे नुकसान झाले. आता बाजारात येणाऱ्या कोकणच्या आंब्यांना, नाशिकच्या द्राक्षांना व इतर काही फळांच्या बाजारात अशा सर्व फळांना भाव कसा मिळेल याकडे लक्ष असणार आहे.

Advertisement