SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

लाल परीचे चाक धावणार..? एसटी संपाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय..!

एसटी संपाबाबत एक महत्वाची बातमी समोर येत आहे. एसटीचा संप आज (ता. 10) मिटण्याची चिन्हे आहेत. एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण शक्य नसले, तरी कर्मचाऱ्यांना विलिनीकरण सदृश्य लाभ देण्यास राज्य सरकारने सहमती दर्शवली आहे. त्यामुळे एसटीचा संप आज मागे घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे..

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरणासाठी गेल्या 4 महिन्यांपासून कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत असून, एसटीचेही मोठे आर्थिक नुकसान झालेय. संपावर गेलेल्या अनेक कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. मात्र, आता हा संप लवकरच मिटण्याची शक्यता आहे.

Advertisement

सातवा वेतन आयोग लागू होणार
एसटी संपाबाबत बुधवारी (ता. 9) विधानसभा अध्यक्षांच्या दालनात महत्त्वाची बैठक झाली. त्यात एसटी कामगारांच्या एकूण 18 मागण्यांवर चर्चा झाली. त्यातील 16 मागण्यांवर सरकार सकारात्मक आहे. एसटी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग लागू करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे समजते..

एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग तात्काळ लागू करायचा की तीन महिन्यांनी, याबाबत परिवहन विभागाचा अभ्यास सुरू आहे. तसेच संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याची ग्वाही सरकारने दिली आहे.

Advertisement

विधानसभेत घोषणा करणार
दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब आज (गुरुवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर मंत्री अनिल परब याबाबतची घोषणा विधानसभेत करणार असल्याची माहिती विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली.

एसटीचे विलीनीकरण झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना जे लाभ मिळाले असते, तसेच विलीनीकरण सदृश्य लाभ एसटी कामगारांना देण्यात येणार आहेत. याबाबत राज्य सरकार आज अंतिम धोरण जाहीर करणार असल्याचेही दरेकर म्हणाले. त्यामुळे लवकरच एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे दिसत आहे..

Advertisement

गेल्या चार महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असल्याने एसटीचे मोठे नुकसान झालेय. शिवाय सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. अखेर एसटी संपाबाबत विधान भवनात झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. सर्वपक्षीय आमदारांची समिती व एसटी कामगार प्रतिनिधींचे एकमत झाले. त्यामुळे एसटीचा प्रदीर्घ काळ चाललेला संप मिटण्याची शक्यता आहे.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement