SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बारावीच्या इंग्रजीच्या पेपरमध्ये मोठी चूक, विद्यार्थ्यांचा फायदा होणार की नुकसान..?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून 4 मार्चपासून बारावीच्या परीक्षेला (HSC Exam) सुरुवात झाली. पहिल्या दिवशी (शुक्रवारी) इंग्रजीचा पेपर झाला.. मात्र, पहिल्याच इंग्रजीच्या पेपरमध्ये काही चूका असल्याच्या तक्रारी विद्यार्थी-पालकांनी केल्या आहेत. त्यानंतरही ही बाब मंडळाच्याही निदर्शनास आली..

येत्या 5-6 दिवसात पेट्रोल आणि डिझेल ‘इतक्या’ रूपयांनी महागण्याची शक्यता..!!

Advertisement

पहिल्याच पेपरमध्ये चूक
परीक्षेत इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये एक गुणाचा प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारण्यात आला होता. त्यामुळे हा प्रश्न सोडविताना विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. ही बाब काही पालकांनी बोर्डाच्या लक्षात आणून दिली.. पेपर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आज (ता. 5) ही चूक बोर्डाच्याही लक्षात आली. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांना या प्रश्नाचा संपूर्ण एक गुण देण्यात येईल, असे मंडळाने स्पष्ट केले.

दरम्यान, राज्यातील 9 हजार 635 परीक्षा केंद्रावर बारावीची परीक्षा होत आहे. त्यासाठी यंदा 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत. मात्र, पहिल्याच पेपरला चूक झाल्याने विद्यार्थी-पालकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली..

Advertisement

मंडळाचे अध्यक्ष काय म्हणाले..?
याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, की “बारावीच्या इंग्रजीच्या पेपरमध्ये एका गुणाच्या प्रश्नात चूक झाल्याचे निदर्शनास आलेय. छपाईदरम्यान ही चूक झाली. मुख्य परीक्षा नियंत्रक व बोर्डाच्या अभ्यास मंडळाच्या बैठकीत या प्रश्नासाठी विद्यार्थ्यांना एक गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केलेल्या विद्यार्थ्यांना हा संपूर्ण एक गुण देण्यात येणार आहे…!”

दरम्यान, बारावीच्या परीक्षेत कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. 5 व 7 मार्च रोजी होणारे पेपर पुढे ढकलले असून, आता ते 5 व 7 एप्रिल रोजी होणार असल्याचे याआधीच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून जाहीर करण्यात आलं आहे.

Advertisement

तसेच, कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाईन झालं.. त्यामुळे त्यांना लिखाणाचा सराव राहिलेला नसल्याने, यावर्षी 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिटे, तर 40 ते 60 गुणांसाठी 15 मिनिटांची वेळ वाढवून देण्यात आलेला आहे.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement