SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पीएम किसान योजनेबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार..!

बळीराजाला सुखा-समाधानाचे दिवस यावेत, यासाठी सरकारतर्फे विविध योजना राबविण्यात येतात.. मात्र, बऱ्याचदा खरे लाभार्थी राहतात बाजूला.. नि त्यांच्या आडून दुसरेच बोगस लोक योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर येते..

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना.. मोदी सरकारची एक महत्वाकांक्षी योजना.. राज्य सरकारांमार्फत ही योजना राबवली जाते. त्यात दरवर्षी 3 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना 6 हजार रुपये मिळतात.. मात्र, या योजनेतही अशाच बोगस लाेकांचा सुळसुळाट झाल्याचे समोर आलेय.. प्राप्तीकर भरणाऱ्या तब्बल 3 लाख लोकांनी योजनेचा लाभ घेतल्याचे आकडेवारी सांगते.

Advertisement

पीएम किसान सन्मान निधी योजनेतील (PM kisan sanman nidhi) असे बोगस शेतकरी शोधण्यासाठी ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतलाय. त्यानुसार, या योजनेचा लाभ घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांची पात्रता तपासली जाणार आहे.. प्राप्तीकर भरणारे किंवा अन्य बोगस लाभार्थी शोधले जाणार असून, त्यांचे लाभ रद्द केले जातील.. शिवाय, आतापर्यंत घेतलेल्या लाभाची रक्कमही वसूल केली जाईल.

बोगस लाभार्थी शोधण्यासाठी या योजनेचे गाव पातळीवर ‘सोशल ऑडिट’ केले जाणार आहे. तसेच या योजनेपासून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या अर्जातील त्रुटी दूर करून त्यांना लाभ दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

गेल्या 20 जानेवारीला मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली योजनेच्या राज्यस्तरीय प्रकल्प आढावा समितीची बैठक झाली. बैठकीत योजनेचा प्रलंबित डाटा दुरुस्तीसाठी विशेष तपासणी शिबिरे घेणे, लाभार्थ्यांची भौतिक तपासणी करणे, योजनेतील अपात्र शेतकऱ्यांकडून त्यांना मिळालेल्या लाभाची रक्कम वसूल करणे, आदी निर्णय घेण्यात आले..

बोगस लाभार्थी शोधण्यासाठी येत्या 25 मार्चला गावनिहाय खास तपासणी शिबिरे घेतली जाणार आहेत. महसूल, कृषी व ग्रामविकास विभागामार्फत संयुक्तपणे लाभार्थ्यांची तपासणी केली जाणार आहे. त्यात पात्र शेतकऱ्यांचा सात-बारा उतारा, आधारकार्ड आणि बॅंक पासबूकची पाहणी केली जाणार आहे.

Advertisement

योजनेसाठी पात्रतेचे निकष
– शेतकरी अल्प किंवा अत्यल्प भूधारक असावा.
– संबंधित शेतकऱ्याकडे कमाल पाच एकर जमीन असावी.
– शेती ही लागवडीलायक असावी.
– वनहक्क कायद्यांतर्गत जिल्हा समितीने पात्र केलेले शेतकरीही लाभ घेऊ शकतात

अपात्र कोण..?
– घटनात्मक पद धारण केलेले आजी-माजी व्यक्ती.
– आजी-माजी मंत्री व राज्यमंत्री
– आजी-माजी खासदार, आमदार
– आजी-माजी महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष

Advertisement

– केंद्र व राज्य सरकारचे अधिकारी-कर्मचारी
– शासन अंगीकृत निमशासकीय संस्थांच्या अखत्यारितील कर्मचारी
– कार्यालयांमधील आणि स्वायत्त संस्थांचे सर्व अधिकारी व कर्मचारी
– स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नियमित अधिकारी व कर्मचारी

– मागील वर्षात प्राप्तीकर (आयकर) भरलेली व्यक्ती
– निवृत्तिवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तिवेतन किमान 10 हजार रुपये वा त्यापेक्षा जास्त आहे.
– नोंदणीकृत व्यावसायिक (डॉक्टर, वकील, अभियंता, सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटंट), वास्तुशास्त्रज्ञ (आर्किटेक्ट).
– एखाद्या कुटुंबात चार-पाच उपकुटुंबे असतील आणि त्यातील प्रत्येकाच्या नावावर दोन हेक्टरपेक्षा कमी शेती असेल, असे सर्व उपकुटुंबे.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement