SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेअर बाजाराची स्थिती पुढील आठवड्यात कशी असणार..? रशिया – युक्रेन युद्धाचा काय परिणाम होणार, तज्ज्ञ काय म्हणतात..?

रशिया व युक्रेनमधील युद्धामुळे सारे जगच चिंतेत सापडले आहे.. जगभरातील भांडवली बाजार कोसळले आहेत. गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारालाही मोठा तडाखा बसला.. शेअर बाजारात (Share Market) सुमारे 3 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली.. नंतर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी शेअर बाजार सावरल्याचे पाहायला मिळाले..

जगावर युद्धाचे संकट गडद होत असल्याने गुंतवणुकदारांनी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा सुरु केला. त्यामुळे गेल्या आठवड्यात निफ्टी (Nifty) 3.6 टक्क्यांनी, तर सेन्सेक्स (Sensex) 3.4 टक्क्यांनी घसरला. ब्रॉडर मार्केटमध्येही मोठी घसरण झाली. मिडकॅप इंडेक्स 3.4 टक्के, तर स्मॉलकॅप इंडेक्स 5.3 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला.

Advertisement

युद्धसदृश परिस्थितीच्या अनिश्चिततेच्या दरम्यान गेल्या आठवड्यात बाजारात कमालीची अस्थिरता दिसली. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर गुरुवारी (ता. 24) सर्वात मोठी एकदिवसीय घसरण नोंदवण्यात आली. मात्र, दुसऱ्या दिवशीच बाजारात जोरदार रिकव्हरी दिसून आली. त्यामुळे पुढील आठवडा कसा असेल, याबाबत गुंतवणुकदारांमध्ये धाकधूक सुरु आहे..

तज्ज्ञ काय म्हणतात…?
गेल्या आठवड्याच्या शेवटी शुक्रवारी (ता. 25) शेअर बाजार सावरल्याचे दिसले. देशांतर्गत गुंतवणूकदारांनी ‘व्हॅल्यू स्टॉक्स’मध्ये खरेदी केली. बाजारात दिसलेला ‘पुलबॅक’ हे चांगले लक्षण आहे, परंतु निफ्टीला 16700-16800 च्या पुढे जाण्यासाठी अजूनही मोठा अडथळा आहे.

Advertisement

निफ्टी या पातळीवर राहिला, तरच अल्पावधीत आणखी वाढ होऊ शकते. निफ्टीला 16500 वर तात्काळ सपोर्ट आहे, जर हा सपोर्ट तुटला तर आणखी घसरण होऊ शकते, असे ‘एचडीएफसी सिक्युरिटीज’चे (HDFC Securities) नागराज शेट्टी यांनी सांगितले..

‘स्वस्तिक इन्व्हेस्टमार्ट’चे संतोष मीना म्हणाले, की शेअर बाजारातील परिस्थिती अजूनही अनिश्चित आहे.. गेला आठवडा शेअर बाजारासाठी खूप वाईट होता. निफ्टी 200-डीएमएच्या खाली सरकताना दिसला. ‘इंडिया व्हीआयएक्स’ (India VIX) अजूनही 25 च्या वर आहे. अशा वेळी पुढील आठवड्यात बाजारात अस्थिरता राहण्याची शक्यता आहे.

Advertisement

कच्च्या तेलाचा भडका
दरम्यान, रशिया-युक्रेन वादाचा फटका आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलालाही बसला. कच्च्या तेलाचे भाव गेल्या 8 वर्षांची विक्रमी पातळी मोडून 100 डॉलरच्याही वर गेले.. त्यामुळे पेट्राेल-डिझेलच्या किंमती भडकण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आगामी आठवड्यातही बाजारात मोठी अस्थिरता दिसेल. देशांतर्गत बाजाराची नजर जीडीपी डेटा, पायाभूत सुविधा, आऊटपुट डेटावर असेल..

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement