वाहतुकीला शिस्त लागावी, रस्ते अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच ट्रॅफिक नियमांमध्ये बदल केले होते. त्यानुसार, दंडाच्या रकमेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. आधीच पेट्राेल-डिझेलचे भाव गगणाला भिडलेले असताना, त्यात दंडाची पावती झाली, तर महिन्याचा घरखर्च भागवणेही कठीण होऊन बसतं…
कधी ‘नो पार्किंग’मध्ये वाहन उभे केले म्हणून, तर कधी सिग्नल तोडला म्हणून, कधी मोबाईल, सीटबेल्ट, गाडीची नंबरप्लेट, लाईट, इंडिकेटर नसल्याच्या कारणांनी वाहतूक पोलिसांनी तुमची दंडाची पावती फाडली असेल… काही वेळा वाहतूक पोलिस वेगवेगळे नियम लावून दंड पावती तुमच्या हातात देतात.
वाहतुकीचा नियम मोडल्याने आता ई-चलन पाठविले जाते. मात्र, अनेकदा तुमची चूक नसताना, दंडाचा बोजा तुमच्यावर पडतो.. वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत घातल्यास सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल होण्याची भीती असते. त्यामुळे अनेक जण दंडाची रक्कम भरुन मोकळे होतात.. मात्र, आता दंडाच्या रकमेतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे तुमचा अख्खा खिसा खाली होऊ शकतो…
वाहतूक नियम मोडल्याच्या कारणावरुन पोलिसांनी पकडल्यास लगेच दंड भरु नका.. सर्वसामान्य नागरिकांनाही याबाबत काही अधिकार देण्यात आले आहेत. मात्र, आपल्यापैकी अनेकांना त्याची माहिती नसते.. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..
दंड आकारल्यास काय कराल..?
– वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्यास तुम्ही ती वेळ, प्रसंग नीट लक्षात ठेवा. लगेच तेथे पैसे भरू नका. पोलिस ठाण्यात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करा. त्यांना चलन कसे चुकीचे करण्यात आलेय, हे पटवून द्या.. सौम्य भाषेत बोलल्यास यात सरकारी कामात हस्तक्षेप केल्याचा मुद्दा येत नाही.
– दंडाचे चलन घरी आल्यास तातडीने वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाईनवर फोन करून माहिती देऊ शकता. तसेच जवळच्या वाहतूक पोलिस ठाण्यात माहिती देता येईल. तेथे तुमची तक्रार ऐकून घेतली गेली नाही, तर तुम्हाला न्यायालयात जाण्याचाही पर्याय आहे. वाहतूक पोलिसांची चूक सिद्ध केलीत, तर दंड भरण्याची गरज पडणार नाही.
– दंडाच्या पावतीविरोधात न्यायालयात दाद मागू शकता. न्यायालयाला कारण द्यायला लागेल.. तुमची कोणतीही चूक नव्हती किंवा तेव्हा तुम्ही तिथे उपस्थित नव्हता, हे पटवून द्यावे लागेल. अनेकदा दुसऱ्याची गाडी असते, परंतू चलन तुम्हाला पाठविले जाते. पोलिसांच्या नजरचुकीने असे घडते. न्यायालयात या बाबी सिद्ध झाल्यास चलन रद्द होईल.
– आता दंडाची रक्कम 10 हजार रुपयांपर्यंत गेली आहे. त्यातही दोन-तीन नियम एकत्र लावल्यास ही रक्कम मोठी होते. त्यामुळे पावती रद्द झाल्यास तर तुमचे पैसे मोठ्या प्रमाणावर वाचतात. इन्शुरन्स कंपन्या दंडाच्या पावत्यांवरून तुम्हाला ‘इन्शुरन्स’ आकारणार आहेत. दंडाचा परिणाम तुमच्या इन्शुरन्स खरेदी आणि क्लेमवरही होणार आहे.