SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे गुण..!

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्याने यंदा दहावी-बारावीच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने म्हणजेच ऑफलाईन घेण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने तयारी सुरु केली आहे. दुसरीकडे विद्यार्थीही जोमाने अभ्यासाला लागले आहेत..

कोरोना संकटामुळे गेली दोन वर्षे शाळा-महाविद्यालये बंद होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अभ्यासक्रम शिकवण्यात आला. मात्र, त्यात सगळ्याच विद्यार्थ्यांचे शिक्षण होऊ शकलेले नाही. विद्यार्थ्यांची मोठे नुकसान झाले.. विद्यार्थ्यांची झालेली हानी भरुन काढण्यासाठी शिक्षण विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत.

Advertisement

शिक्षण विभागाने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘गूड न्यूज’ दिली आहे. ती म्हणजे, क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षेत मोठा फायदा होणार आहे. विविध स्पर्धांच्या आधारावर विद्यार्थ्यांना या परीक्षेत सवलतीचे गुण देण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली.

दहावी-बारावीच्या परीक्षा आता तोंडावर आलेला असतानाच, हा निर्णय घेण्यात आल्याने मैदानात घाम गाळणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.. काही विद्यार्थी खेळासाठी बराच काळ मैदानात असतात. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत त्यांना अभ्यासासाठी कमी वेळ मिळतो. ही बाब लक्षात घेऊन या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाने सवलतीचे गुण देण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

कोणाला मिळणार सवलतीचे गुण..?
– माध्यमिक शालांन्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तो सातवी व आठवीत असताना झालेल्या क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेऊन सवलतीचे क्रीडा गुण मिळतील.

– बारावीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत नववी व दहावीतील विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेऊन क्रीडा सवलतीचे गुण मिळणार आहेत. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांना तसे निर्देश दिल्याची माहिती शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली. ही सवलत केवळ यंदाच्या (2021-22) परीक्षेसाठीच असणार आहे.

Advertisement

दरम्यान, दहावी, बारावीच्या परीक्षा सुरक्षित वातावरणात, कोविड नियमांचे पालन करुन घेण्यावर राज्य शासनाचा भर असणार आहे. त्यादृष्टीने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षांची जोरदार तयारी सुरु केली आहे.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement