SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

टी-20 मालिकेत वेस्ट इंडिजला ‘व्हाईट वाॅश’, तिसऱ्या मॅचमध्ये टीम इंडियाचा थरारक विजय..

वेस्ट इंडिज क्रिकेट संघासाठी यंदाचा भारताचा दौरा निराशाजनक ठरला. वन-डे मालिकेत खराब कामगिरी केल्यानंतर टी-20 मालिकेतही वेस्ट इंडिजच्या संघाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. खरं तर वेस्ट इंडिजचे खेळाडू सातत्याने टी-20 क्रिकेट खेळतात. मात्र, टीम इंडियाने सलग तिन्ही सामने जिंकताना, वेस्ट इंडिजला व्हाईट वाॅश दिला..

पहिले दोन्ही सामने जिंकल्याने टीम इंडियाने तीन सामन्यांची टी-20 मालिका आधीच खिशात घातली होती. त्यामुळे भारतीय संघाने माजी कॅप्टन विराट कोहली, विकेट किपर ऋषभ पंत यांच्यासह भुवनेश्वर कुमार व यजुवेंद्र चहल यांना या सामन्यात विश्रांती दिली. त्यांच्या जागी श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर यांचा संघात समावेश करण्यात आला. वेगवान गोलंदाज आवेश खानने या सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

Advertisement

टी-20 मालिकेतील तिसरा सामना जिंकून भारत दौऱ्याचा शेवट गोड करण्यासाठी वेस्ट इंडिजने तगडा संघ मैदानात उतरविला होता. कॅप्टन किरॉन पोलार्डने टाॅस जिंकून भारतीय संघाला बॅटिंगसाठी पाचारण केले.

भारताची निराशाजनक सुरुवात
कर्णधार पोलार्डचा हा निर्णय विंडीजच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. तिसऱ्याच षटकात भारताने ऋतुराज गायकवाडची (4) विकेट गमावली. नंतर 9.4 षटकात भारताची 3 बाद 66 अशी अवस्था झाली. मात्र, सूर्यकुमार यादव व वेंकटेश अय्यर या जाेडीने पुन्हा एकदा भारताचा डाव सावरला.

Advertisement

‘सूर्या’ तळपला
सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) 31 चेंडूत 65 धावांची धडाकेबाज अर्धशतकी खेळी केली. त्यात 7 षटकार व एका चौकाराचा समावेश होता. वेंकटेशने 19 चेंडूत 35 धावा करीत त्याला चांगली साथ दिली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 41 चेंडूत 91 धावांची भागीदारी करताना, भारताला सन्मानजनक 184 धावांपर्यंत मजल मारुन दिली.

जिंकण्यासाठी 185 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजचे दोन्ही सलामीवीर पहिल्या तीन षटकांत माघारी परतले. पण, त्यानंतर सातत्यपूर्ण कामगिरी करणारा निकोलस पूरन, रोवमन पॉवेल यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. शार्दूल ठाकूरने मोक्याच्या क्षणी निकोलसची विकेट घेत सामना फिरवला.

Advertisement

अखेरच्या षटकांत शेफर्ड (29) याने भारतीय फॅनची धडकन वाढवली होती. मात्र, भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करताना अखेरपर्यंत सामन्यावरील पकड सुटू दिली नाही. हर्षल पटेलने 4 षटकांत 22 धावांत 3 विकेट्स घेतल्या. दीपक चाहरने 2, शार्दुल ठाकरूने 2, वेंकटेश अय्यरने 2 बळी घेतले. सामनावीर व मालिकावीराच्या पुरस्कारांनी सूर्यकुमार यादव याला गौरवण्यात आले.

भारताने तिन्ही सामने जिंकून वेस्ट इंडिजला क्लिन स्विप दिला. त्यामुळे आयसीसी टी-20 रॅंकिंगमध्ये टीम इंडियाने पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे..

Advertisement