खासगी क्षेत्रात अनेक कर्मचारी वारंवार नोकरी बदलत असतात.. कधी मोठी ‘पोस्ट’, तर कधी चांगल्या पगारवाढीसह अनेक कारणांसाठी नोकरी बदलली जाते. मात्र, नोकरी बदलली, तरी अनेक कर्मचारी पूर्वीच्या बॅंकेतील ‘सॅलरी अकाऊंट’ बंद करीत नाहीत.. मात्र, असं करणं अनेकदा अंगलट येऊ शकते..
नोकरी बदलल्यावर जुने ‘सॅलरी अकाउंट’ (salary account) बंद केले नाही आणि काही महिन्यानंतर पुन्हा त्या बॅंकेतील सॅलरी अकाऊंट चेक करायला गेल्यास बँकेकडून आपल्याला काही रक्कम भरायला सांगितली जाते. अनेकांसोबत असे झाले असेल.. त्यामागे बँकेचे काही नियम आहेत, हे जाणून घेऊ या..
नियम काय..?
– तीन महिन्यांपर्यंत पगाराची रक्कम ‘सॅलरी अकाउंट’मध्ये जमा न झाल्यास त्या खात्याचे रुपांतर ‘सेव्हिंग अकाउंट'(saving account)मध्ये होते. नियमानुसार, ‘सेव्हिंग अकाउंट’मध्ये महिन्याला सरासरी 500 ते 10 हजार रुपयांपर्यंत शिल्लक ठेवायला लागते.
– तुमच्या सॅलरी खात्यात पगार येत नसेल आणि त्या खात्यातून दोन वर्षे कोणताही व्यवहार झाला नाही, तर संबंधित सॅलरी खाते निष्क्रीय मानले जाते. बचत खात्यासाठी ‘मिनिमम बॅलन्स’ (Minimum balance) ठेवावा लागतो. शिवाय डेबिट कार्ड, एसएमएस अलर्ट आणि चेकबूकसाठी अतिरिक्त शुल्क अदा करावे लागते.
– बँक खात्यात सलग 12 महिने कोणताही व्यवहार न केल्यास, बँक तुमचे खाते निष्क्रिय खाते मानते. अशा निष्क्रिय खात्यांवर व्यवहार करण्यास मनाई नसली, या खात्यातून तरी नेट बँकिंग (Net banking), एटीएम व्यवहार किंवा मोबाइल बँकिंग करू शकत नाही. बँकाही तुमचे डेबिट कार्ड, चेकबूक आणि पत्ता बदलण्यास मनाई करू शकतात.
– नवीन ठिकाणी नोकरीला लागल्यानंतर जुन्या कंपनीतील बँक खाते बंद न केल्यास, संबंधित बँक तुमचे खाते फ्रीज करते. हे खाते पुन्हा सुरु करता येत असले, तरी त्यासाठी दंड भरावा लागतो. त्यामुळे नवीन कंपनीत रुजू झाल्यावर जुने सॅलरी अकाऊंट बंद करावे, किंवा बचत खात्यासारखा त्याचा वापर करावा..
– विविध सेवांसाठी बँका तुमच्या खात्यातून पैसे कापत असतात. खात्यावरील रक्कम शून्य झाली, तरी दंडाचा भुर्दंड वाढतो. दंडाची रक्कम न भरल्यास, बँक तुम्हाला ‘डिफॉल्टर’ घोषित करतात. त्यामुळे तुमचा ‘सिबील’ रेकॉर्ड खराब होऊ शकतो.