‘आयपीएल-2022’ (IPL-2022) साठी नुकतेच बंगळुरूमध्ये ‘मेगा ऑक्शन’ पार पडले. खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागली. त्यात ईशान किशन, दीपक चहर, लियाम लिव्हिंगस्टोन यांसारख्या खेळाडू रातोरात मालामाल झाले. त्याच वेळी सुरेश रैना, स्टिव्ह स्मिथ, ईशांत शर्मा अशा दिग्गज खेळाडूंवर संघ मालकांनी बोली लावली नाही.
‘आयपीएल’चे ‘मेगा ऑक्शन’ (Mega Auction)सुरु असताना, पहिल्या दिवशीच ‘ऑक्शनर’ ह्युज एडमीड्स अचानक चक्कर येऊन कोसळले. ऐनवेळी चारू शर्मा यांनी सगळी सूत्रे हातात घेऊन, लिलाव प्रक्रिया पार पाडली. चारू शर्मा यांनी एडमिड्स यांची उणीव भासू दिली नाही. मात्र, ‘मेगा ऑक्शन’च्या दुसऱ्या दिवशी चारु शर्मा यांच्याकडून मोठी चूक झाल्याचे समोर येत आहे..
व्हॅलेंटाईन वीकनंतर आता अँटी व्हॅलेंटाईन वीक सुरु; या आठवड्यात कोणकोणते दिवस साजरे केले जातात
नेमकं काय झालं..?
‘मेगा ऑक्शन’च्या दुसऱ्या दिवशी भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमद याच्यासाठी बोली लावली जात होती. खलीलला आपल्या संघात ओढण्यासाठी ‘मुंबई इंडियन्स’ (Mumbai Indians) व ‘दिल्ली कॅपिटल्स'(Dehli capitals)मध्ये जोरदार रस्सीखेच सुरु होती. त्यावेळी चारु शर्मा यांच्याकडून ही चूक झाल्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे..
— Ashok (@Ashok94540994) February 15, 2022
Advertisement
‘दिल्ली कॅपिटल्स’ने खलील अहमद याला 5.25 कोटी रुपयांना खरेदी केले. मात्र, याच किंमतीत खलील अहमद हा दिल्लीऐवजी मुंबईला मिळाला असता. ‘दिल्ली कॅपिटल्स’चे सहमालक किरणकुमार ग्रांथी यांनी खलीलवर 5 कोटी रुपयांची बोली लावली होती. त्यानंतर ‘मुंबई इंडियन्स’ने 5.25 कोटी रुपयांची बोली लावली.
दरम्यान, मुंबईने बोली लावली, त्याच वेळी काहीसा गोंधळ उडाला… नंतर ग्रांथी यांनी दिल्लीकडून 5.5 कोटी रुपयांची बोली लावण्यासाठी पॅडल उचलले. मात्र, नंतर थोडा विचार केल्यानंतर त्यांनी माघार घेत, पॅडल पुन्हा खाली ठेवले. मात्र, दिल्ली कॅपिटल्सने 5.5 कोटी रुपयांची बोली मागे घेतल्याचे चारू शर्मा यांच्या लक्षात आले नाही.
मुंबई इंडियन्सने 5.25 कोटी रुपयांची बोली लावल्याचे ते विसरले नि दिल्ली कॅपिटल्सनेच सर्वाधिक 5.25 कोटी रुपयांची बोली लावल्याचे जाहीर केले. तसेच, नंतर मुंबई इंडियन्सला 5.5 कोटींची बोली लावणार का, अशी विचारणाही त्यांनी केली. त्यास मुंबईने नकार दिला नि चारू शर्मा यांनी खलील अहमद याला दिल्ली कॅपिटल्सला 5.25 कोटी रुपयांना दिले.
वास्तविक, दिल्लीआधी मुंबईनेच 5.25 कोटी रुपयांची बोली लावली होती. त्यामुळे खलील अहमद हा खेळाडू मुंबईलाच मिळायला हवा होता. मात्र, चारु शर्मा यांच्या चुकीमुळे तो दिल्लीकडे गेला. मुंबईनेही त्यावर आक्षेप घेतला नाही. आता ही चूक मुंबईला किती महागात पडते, हे ‘आयपीएल’ स्पर्धेला सुरुवात झाल्यावरच समोर येईल..