केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी काही दिवसांपूर्वी सुरू केलेली खास योजना आता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘कोविड-19 रिलिफ स्कीम’ (Covid-19 Relief Scheme) असे या योजनेचे नाव आहे. देशात कोरोनाचा कहर सुरु झालेला असताना, मोदी सरकारने कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) अंतर्गत 24 मार्च 2020 रोजी दोन वर्षांसाठी ही योजना सुरु केली होती.
‘ईएसआयसी’ अंतर्गत येणाऱ्या नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. कोरोना काळात ईएसआयसी अंतर्गत येणाऱ्या नोंदणीकृत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबाला या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जात होती. येत्या मार्चमध्ये या योजनेला 2 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे मोदी सरकारने आता ही योजना बंद करण्याच्या निर्णय घेतला आहे.
देशात आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने मोदी सरकारने ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचारी राज्य विमा निगमच्या गव्हर्निंग बॉडीची नुकतीच बैठक झाली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र, ‘ईएसआयसी’शी संबंधित सूत्रांच्या मते, अजून एक वर्षभर तरी ही योजना सुरू राहावी, अशी मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे.
कोरोना संसर्ग घटला
याबाबत केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी माहिती दिली. ते म्हणाले, की “देशात कोरोना संसर्गाचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. कोरोनाची तिसरी लाट ओसरली असून, रोजच्या रुग्णांमध्ये 93 टक्के घट झाली आहे. त्यामुळे कोविडबाबतच्या मदत योजना यापुढे सुरू ठेवण्याची गरज नाही. ईएसआयसी रुग्णालयांकडून श्रमिकांच्या आरोग्याची तपासणी सुरु राहील. तसेच फॅक्टरी-एमएसएमई क्लस्टरला एक युनिट मानले जाईल.”