SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

तुमच्या जुन्या स्मार्टफोनला तगडी किंमत मिळणार, ‘फ्लिपकार्ट’कडून खास प्रोग्राम लाॅंच..!

सध्याच्या काळात सर्वाधिक झपाट्याने मोबाईल तंत्रज्ञानात बदल होत आहेत. रोज नवनवे, अधिक ‘स्मार्ट’ मोबाईल बाजारात येत आहेत. अशा वेळी जुन्या मोबाईलचे करायचे काय, असा प्रश्न उभा राहतो. ‘सेकंड हॅंड’ मोबाईलला बाजारात फारशी किंमत मिळत नसल्याने अगदी चांगल्या स्थितीतील मोबाईल कवडीमोल भावाने विकावे लागतो, किंवा कचऱ्यात फेकून दिला जातो..

मात्र, आता ग्राहकांची ही अडचण दूर होणार आहे.. तुमच्या जून्या मोबाईलला तगडी किंमत मिळू शकते. फ्लिपकार्ट (Flipkart) कंपनीने मोबाईल विक्रीबरोबरच आता मोबाईल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ‘फ्लिपकार्ट’ने सोमवारपासून (ता. 14) युजर्ससाठी ‘सेल बॅक प्रोग्राम’ सुरू केला आहे.

Advertisement

तुम्हाला तुमचा जुना स्मार्टफोन चांगल्या किंमतीत विकायचा असेल, तर ‘फ्लिपकार्ट’च्या या नवीन सेवेचा लाभ तुम्ही घेऊ शकता. ग्राहक आपले जुने, वापरलेले स्मार्टफोन येथे विकू शकतील. सध्या ‘फ्लिपकार्ट’च्या या ‘सेल बॅक प्रोग्राम’मध्ये फक्त ‘स्मार्टफोन’चाच समावेश केला आहे. मात्र, लवकरच अन्य कॅटेगरीजच्या प्रोडक्ट्सचाही त्यात समावेश केला जाणार आहे..

‘ई-वेस्ट’ची समस्या सुटणार..
‘आयडीसी’ (IDC)च्या सर्वेक्षणानुसार, भारतात 12.5 कोटी वापरलेले स्मार्टफोन असून, पैकी फक्त 20 दशलक्ष स्मार्टफोन बाजारात विकले जातात.. उर्वरित स्मार्टफोन कचऱ्यात जातात. त्यातून देशात मोठ्या प्रमाणात ‘ई-वेस्ट’ जमा होत असून, त्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.

Advertisement

देशातील ‘ई-वेस्ट’ची ही समस्या लवकर सोडविणे अत्यंत गरजेचे आहे. अशा वेळी ‘फ्लिपकार्ट’चा ‘सेल बॅक प्रोग्राम’ ही समस्या कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत करू शकतो. येथे युजर्सना त्यांच्या जुन्या फोनच्या बदल्यात चांगली डील ऑफर केली जाते.. विशेष म्हणजे, ‘फ्लिपकार्ट’वरून खरेदी न केलेले स्मार्टफोनही तुम्ही ‘सेल बॅक प्रोग्राम’ अंतर्गत विकू शकता..

‘फ्लिपकार्ट’वर कसे विकणार.?
काही दिवसांपूर्वी ‘फ्लिपकार्ट’ने ‘यंत्रा'(Yaantra) नावाच्या इलेक्ट्रॉनिक्स री-कॉमर्स फर्मचे अधिग्रहण केले होते. ही फर्म जूने स्मार्टफोन्स विकत घेते. या फर्मच्या मदतीने ‘फ्लिपकार्ट’ने हा नवीन प्रोग्राम सुरु केला आहे.. भारतातील प्रमुख शहरांपैकी 1,500 पेक्षा जास्त पिनकोडवर ही सेवा मिळणार आहे..

Advertisement
  • सर्वप्रथम फ्लिपकार्ट अ‍ॅपवर जा. तळाच्या मध्यभागी दिलेल्या बारमधील ‘सेल बॅक’ पर्याय निवडा.
  • तीन सोप्या प्रश्नांची उत्तरे देऊन तुमच्या जुन्या मोबाईलची किंमत जाणून घ्या. किंमत योग्य वाटल्यास त्याची पुष्टी करा.
  • पुष्टीकरणानंतर 48 तासांत ‘फ्लिपकार्ट एक्झिक्युटिव्ह’ तुमच्या घरी किंवा दिलेल्या पत्त्यावर येतील नि डिव्हाइस जमा करुन घेतील..
  • हँडसेट पडताळणीनंतर काही तासांत कन्फरमेशन झालेल्या विक्रीच्या बॅक व्हॅल्यूनुसार फ्लिपकार्टकडून ‘ई-व्हाउचर’ जारी केले जाईल.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement