SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

10 रुपयांच्या नाण्यांचा वाद, केंद्र सरकारने दिली संसदेत महत्वाची माहिती..!

सध्या भारतीय चलनात 1, 2, 5 व 10 रुपयांची नाणी आहेत. मात्र, 10 रुपयांच्या नाण्यावरुन अनेकदा चुकीच्या अफवा पसरल्याचे दिसते. हे नाणं चलनबाह्य झाल्याची आवई उठते. याबाबत रिझर्व्ह बॅंकेने अनेकदा स्पष्टीकरण दिल्यानंतरही व्यापारी, दुकानदार हे 10 रुपयांचे नाणे स्वीकारत नसल्याचे दिसते.

एकीकडे 10 रुपयांच्या नाण्यांवरुन हा वाद सुरु असताना, आता आणखी एक प्रकार समोर आला आहे. तो म्हणजे, 10 रुपयांची वेगवेगळी नाणी बाजारात पाहायला मिळतात. एकाच वेळी ती हातात पडल्यास त्यापैकी नेमकं खरं नाणं कोणतं, असा प्रश्न अनेकांना पडत असल्याचे दिसते..

Advertisement

याबाबत केंद्र सरकारने नुकतेच संसदेत स्पष्टीकरण दिले. बाजारात आढळून येणारी 10 रुपयांची विविध नाणी चलनात असून, ती सगळी नाणी पूर्णपणे वैध असल्याचे केंद्र सरकारतर्फे सांगण्यात आले..

राज्यसभेत ए. विजयकुमार यांच्या प्रश्नाला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी 8 फेब्रुवारीला लेखी उत्तर दिले. बाजारात दिसणारी 10 रुपयांची सर्व नाणी वैध आहेत. सर्व प्रकारच्या व्यवहारांसाठी ही नाणी वापरली जाऊ शकतात, असे राज्यमंत्री चौधरी यांनी सांगितले.

Advertisement

भारत सरकारच्या अखत्यारीत विविध आकार, थीम आणि डिझाइनमध्ये 10 रुपयांची नाणी तयार करण्यात येतात. रिझर्व्ह बॅंकेतर्फे प्रसारित करण्यात येणारी ही सर्व 10 रुपयांची नाणी कायदेशीर असून, सर्व प्रकारच्या व्यवहारांमध्ये ती वापरता येत असल्याचे पंकज चौधरी यांनी आपल्या उत्तरात सांगितले.

‘आरबीआय’कडून जनजागृती
दरम्यान, 10 रुपयांची नाणी काही ठिकाणी व्यापारी, दुकानदार स्वीकारत नसल्याच्या तक्रारी येत असल्याचे चौधरी म्हणाले. लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी, त्यांच्यातील गैरसमज, भीती दूर करण्यासाठी ‘आरबीआय’ (RBI)कडून वेळोवेळी प्रयत्न केले जातात. त्यासाठी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जनजागृती केली जाते. 10 रुपयांची सर्व 14 डिझाईनची नाणी वैध असल्याचे ‘आरबीआय’ने स्पष्ट केले आहे, असे चौधरी यांनी सांगितले..

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement