SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

लता मंगेशकर यांच्या नावे कोणताही उपक्रम नको.., मंगेशकर कुटुंबीयांची पत्राद्वारे नाराजी..!

गानकोकीळा, भारतरत्न लता मंगेशकर यांचे रविवारी (6 फेब्रुवारी) वृद्धापकाळाने निधन झाले नि अवघा देश शोकसागरात बुडाला.. मात्र, त्यानंतर काही वेळातच दीदींच्या स्मारकावरुन राजकारण सुरु झालं. राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाली.. या सगळ्या पार्श्वभूमीवर मंगशेकर कुटुंबाने मोठा निर्णय घेतला आहे..

मुंबई विद्यापीठात नुकतीच व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली.. त्यात ‘स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर अध्यासन केंद्र’, तसेच लता मंगेशकर यांच्या नावाने ‘प्राध्यापक चेअर’ सुरू करणे आणि ‘सुवर्ण पदक’ प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्याला मंगेशकर कुटुंबाने आक्षेप घेतला आहे..

Advertisement

याबाबत मंगेशकर कुटुंबीयांचे निकटवर्ती मयुरेश पै यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांना पत्र पाठवले आहे. मुंबई विद्यापीठात लता मंगेशकर यांच्या नावाने अध्यासन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी मंगेशकर कुटुंबीयांना विश्वासात घेतले गेले नाही. त्यामुळे मंगेशकर कुटुंबीयांना हा निर्णय मान्य नसल्याचे पत्रात म्हटले आहे.

मुंबई विद्यापीठाच्या या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त करतानाच, यापुढे मंगेशकर कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय लता मंगेशकर यांच्या नावाने मुंबई विद्यापीठात परस्पर कोणताही उपक्रम हाती घेऊ नये, अशी विनंतीही पत्रात केली आहे.

Advertisement

लता दीदींची अपुरी इच्छा..!
मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे शासकीय संगीत महाविद्यालय स्थापन करावे, अशी लता दीदींची इच्छा होती. त्यानुसार राज्य सरकारने मंगेशकर कुटुंबातील सदस्य नि संगीत क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती स्थापन केली. या समितीने शासकीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्याबाबत शिफारस केली.

मुंबई विद्यापीठात त्यासाठी जागेची पाहणी करण्यात आली आणि जागा निश्चितही झाली. मात्र, नंतर समितीने निश्चित केलेली जागा उपलब्ध करुन देण्यात आली नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संगीत महाविद्यालयाचे दीदींचे स्वप्न त्यांच्या हयातीत काही पूर्ण झालं नाही. याबाबत मंगेशकर कुटुंबीयांनी पत्रातून नाराजी व्यक्त केलीय.

Advertisement

आता ‘भारतरत्न लता दिनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय’ या नावाने शासकीय संगीत महाविद्यालय स्थापन करावं, अशी मंगशेकर कुटुंबीयांची मागणी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे ही मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार ठाकरे सरकार लवकरच हा निर्णय जाहीर करील, अशी अपेक्षा पत्रात व्यक्त केली आहे.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement