अवघ्या महाराष्ट्राला हादरवणाऱ्या वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांड खटल्याचा आज (ता. 10) निकाल लागला.. हिंगणघाट जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने या घटनेतील मुख्य आरोपी विक्की ऊर्फ विकेश नगराळे याला आजीवन कारावास व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
या दुर्दैवी घटनेत प्रा. अंकिता पिसुड्डे हिचा आजच्याच दिवशी (10 फेब्रुवारी 2020) मृत्यू झाला होता. तिच्या दुसऱ्या स्मृतिदिनीच कोर्टाने निकाल दिला. त्यामुळे ही खऱ्या अर्थाने प्रा. अंकिताला श्रद्धांजली असल्याची प्रतिक्रिया विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनी दिली. न्यायालय परिसरात आज चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
नेमकं काय घडलं होतं..?
अंकिता पिसुड्डे व आरोपी विकेश नगराळे हे दोघेही हिंगणघाट तालुक्यातील दारोडा गावाचे रहिवाशी.. हिंगणघाट येथील (स्व.) आशा कुणावार महिला महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची अर्धवेळ प्राध्यापक म्हणून अंकिता पिसुड्डे कार्यरत होती. आरोपीचे अंकितावर एकतर्फी प्रेम होते. आपल्यासोबत लग्न न केल्यास, त्याने अंकिताला जिवे मारण्याची धमकी दिली होती.
विशेष म्हणजे, आरोपी विकेशचे लग्न झालं असून, त्याला एक मुलगी आहे. घटना घडली, त्याच काळात त्याला रेल्वेत नोकरी लागली होती. घटनेच्या आधी तीन महिन्यांपासून तो पीडितेला त्रास देत होता. त्याने तिचा जुळलेला विवाह तोडला होता. त्यामुळे पीडितेच्या वडिलांनी त्याला चांगलंच खडसावलं होतं. त्यानंतरही तो पीडितेला त्रास देत होता.
दारोडा येथून 3 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी अंकिता पिसुड्डे बसने हिंगणघाटला आली. या शहरातील नंदोरी चौकातून कॉलेजकडे जात असताना, रस्त्यात दबा धरुन बसलेला आरोपी विकेश नगराळे अचानक तिच्यासमोर आला. अगोदरच दुचाकीतून काढलेले पेट्रोल त्याने अंकिताच्या अंगावर ओतून तिला पेटवून दिले व तेथून पळ काढला.
गंभीररीत्या जळालेल्या अवस्थेत अंकिताला नागपुरमधील ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर 10 फेब्रुवारी 2020 रोजी तिने अखेरचा श्वास घेतला.
दरम्यान, या घटनेनंतर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, पोलिसांनी आरोपी विकेशला 3 फेब्रुवारीलाच अटक केली.
महिला तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलिस अधिकारी तृप्ती जाधव यांनी कार्यालयीन कामकाजाच्या 19 दिवसांत दोषारोप पत्र पूर्ण केले. आरोपी विकेश विरुद्ध तब्बल 426 पानांचे दोषारोपपत्र 28 फेब्रुवारीला हिंगणघाटच्या न्यायालयात सादर करण्यात आले. राज्य सरकारने या खटल्यासाठी विशेष सरकारी वकिल म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक केली..
हिंगणघाटच्या न्यायालयात या खटल्यात 64 सुनावण्या घेत 29 साक्षीदारांचे प्रत्यक्ष जबाब नोंदवण्यात आले. पैकी एकही साक्षीदार फितूर झालेला नाही. त्यामुळे आरोपीचा दोष सिद्ध होण्याइतपत भक्कम पुरावे मिळाले. त्या आधारे कोर्टाने आरोपी विकेशला काल (ता. 9) दोषी ठरवले होते. अखेर आज त्याला मरेपर्यंत जन्मठेपची शिक्षा सुनावण्यात आली.
न्याय मिळाला नाही
न्यायालयाने आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली असली, तरी आम्ही कोर्टाच्या निर्णयावर समाधानी नाही. आरोपीला फाशीचीच शिक्षा व्हायला हवी होती.. अशी प्रतिक्रिया पीडिता अंकिताच्या आईनी दिली आहे..