SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

लता मंगेशकर यांच्यावर झाला होता विषप्रयोग, घरातील स्वयंपाक्याने केला होता घात..!

भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज (6 फेब्रुवारी) वयाच्या 92 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या 28 दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, शनिवारी (5 फेब्रुवारी) त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवले होते. अखेर आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

लता दीदींच्या आवाजाने चाहत्यांना निखळ आनंद दिला. मात्र, दीदींच्या ज्या आवाजावर आज सारे जग असिम प्रेम करते, तो आवाजच बंद करण्याचा एकदा प्रयत्न झाला होता. लता मंगेशकर 33 वर्षांच्या असताना, त्यांच्यावर विषप्रयोग करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

Advertisement

खुद्द लता मंगेशकर यांनीच याबाबतचा खुलासा केला होता.. तसेच प्रसिद्ध कवियित्री आणि हिंदी साहित्यकार पद्मा सचदेव यांच्या ‘ऐसा कहां से लाऊं’ या पुस्तकात याबाबत माहिती देण्यात आली आहे.

नेमकं काय झालं होतं..?
आपल्या मुलाखतीत लता दीदींनी सांगितलं होतं, की “ते 1963 वर्ष होते. एके दिवशी झोपेतून उठल्या, तेव्हा त्यांच्या पोटात अचानक दुखू लागलं. त्यानंतर त्यांना 3-4 वेळा उलट्या झाल्या.. त्याचा रंग काहीसा हिरवा होता. त्यानंतर त्यांचा त्रास एवढा वाढला, की त्यांना जागचं हलताही येत नव्हतं..”

Advertisement

“मला खूपच अशक्तपणा होता. जवळपास तीन महिने अंथरुणावरून उठताही येत नव्हते. इतकेच नाही, तर स्वतःच्या पायांवर चालणेही मुश्किल झाले होते. प्रदीर्घ काळ माझ्यावर उपचार सुरू होते. मंगेशकर कुटुंबातील कुणीही सदस्य या घटनेबद्दल फार बोलत नाही. कारण आमच्या सर्वांच्याच आयुष्यात ते दिवस खूपच वाईट होते.”

‘मला स्लो पॉयझन दिले होते..’ असे लता दीदींनी नंतर स्वतः खुलासा केला. विषप्रयोग झाल्यानंतर पुढचे 3 दिवस लता मंगेशकर पूर्णत: बेशुद्धावस्थेत होत्या. त्यानंतर दीदी हळूहळू यातून सावरल्या. विषामुळे त्यांच्या आवाजावर परिणाम झाला. तीन महिने त्यांना अंथरूणात राहावं लागलं. या काळात त्यांची बहिण उषा मंगेशकर यांनी दीदींच्या खाण्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली.

Advertisement

या घटनेनंतर लता मंगेशकर यांच्या घरी जेवण करणारा महाराज गायब झाला हाेता. आपला पगार न घेता, कोणालाही कोणतीही माहिती न देता, एके दिवशी त्याने अचानक घर सोडलं. हा महाराज त्याआधी बॉलिवूडमधील काही मंडळींकडे जेवण तयार करीत असल्याचेही समोर आले.

पद्मा सचदेव आपल्या पुस्तकात लिहितात, की या घटनेनंतर लता दीदी खूप अशक्त झाल्या. त्यांच्या घशाला इतका त्रास होत असे, की खूप काळजी घ्यायला लागली. तीन महिने त्या फक्त थंड सूप घेत असतं. या घटनेनंतर त्यांनी ’20 साल बाद’ चित्रपटातील ‘कहीं दीप जले कहीं दिल’ हे गाणे गायले.. जे नंतर सुपरहिट झाले होते..

Advertisement

संगीतकार सी. रामचंद्र यांनीही हा किस्सा आपल्या पुस्तकात लिहीला आहे. दरम्यान, आजपर्यंत त्या स्लो पॉयझनचा उलगडा झालेला नाही. लता दीदींनी त्यानंतर अनेक गाणी गायली.

🎯 अशाच ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन WhatsApp वर Free मिळवण्यासाठी क्लिक करा 👉🏻 https://jio.sh/spreadit

Advertisement