गेल्या आठ दशकांहून अधिक काळ जगभरातील अगणित संगीतप्रेमींचं भावविश्व समृद्ध करणारा दैवी स्वर अखेर आज (रविवारी) शांत झाला. जगतविख्यात पार्श्वगायिका, गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला..
लता मंगेशकर यांना 8 जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. नंतर त्यांना न्यूमोनिया झाल्याचे समोर आलं. मात्र, लता दीदी उपचारांना चांगल्या प्रतिसाद देत असल्याचे वृत्त आले होते.. त्यामुळे त्यांचा व्हेंटिलेटर सपोर्टही काढण्यात आला, पण शनिवारी पुन्हा त्यांची प्रकृती बिघडली.
ब्रीच कँडी रुग्णालयात डॉ. प्रतीत सामदानी व त्यांची टीम लता दीदी यांच्यावर उपचार करीत होती. मात्र, आज सकाळी त्यांची प्रकृती जास्तच खालावली. त्यानंतर सकाळी 8.12 मिनिटांनी त्यांचे निधन झाल्याचे रुग्णालयाकडून जाहीर करण्यात आले..
लता दिदी विषयी…
तत्कालीन इंदोर संस्थानात 28 सप्टेंबर 1929 रोजी लतादीदींचा जन्म झाला. मंगेशकरांच्या घरातलं हे थोरलं अपत्य. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे आपल्या या थोरल्या लेकीवर जीवापाड प्रेम होतं. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत लता दीदी ताना घेत. नंतर त्यांनी गाण्याचं रीतसर शिक्षण घेतलं नि संगीत नाटकातून पं. दीनानाथ मंगेशकरांची ही लेक व्यासपीठावर वावरू लागली..
दुर्दैवाने दीदींच्या बालपणीच पित्याचं छत्र हरपलं.. अवघ्या 13व्या वर्षी छोट्या लताची लता दीदी झाली. आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ या पाठच्या भावंडांची जबाबदारी नकळत्या वयात त्यांच्यावर आली.. 1945 मध्ये लतादीदी मुंबईत आल्या नि पार्श्वगायनाचे विश्व त्यांच्यापुढे खुलं झालं.. हिंदी-मराठीच नव्हे, तर तब्बल 36 भारतीय भाषांमध्ये सुमारे 30 हजारांहून अधिक गाणी लतादीदींनी गायली आहेत.
सामान्य परिस्थितीतून आपल्या अपार मेहनतीने त्या आघाडीच्या पार्श्वगायिका बनल्या. भावोत्कट स्वर, सुस्पष्ट शब्दोच्चार आणि अलौकिक आवाजाच्या जोरावर त्यांनी हे अढळ स्थान प्राप्त केलं.
भारत सरकारने 2001 मध्ये ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन लतादीदींचा गौरव केला. तत्पूर्वी चित्रमहर्षी दादासाहेब फाळके पुरस्कारही त्यांना देण्यात आला होता. शिवाय 2009 मध्ये फ्रान्सने ‘ऑफिसर ऑफ द लीजन ऑफ ऑनर’, तसेच ब्रिटीश सरकारनेही त्यांना सर्वोच्च नागरी सन्मानाने दीदींना गौरवले.
स्वरलता, गानकोकिळा, दैवी आवाजाची देणगी लाभलेली गानसरस्वरी… अशा शेकडो अद्वितीय विशेषणांनी नावाजलेल्या महान गायिका लता मंगशकर यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. सहस्त्रकातून एखाद्या कलाकाराला लाभतो, असा दैवी आवाज लतादीदींना लाभला होता. त्यांच्या निधनाने संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे..