लता दीदी यांच्या निधनामुळे राज्यात उद्या सार्वजनिक सुटी, केंद्र सरकारकडून दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर..
भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज सकाळी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारादरम्यान दीर्घ आजाराने निधन झाले. त्यामुळे सारा देश शोकसागरात बुडाला.. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. सरकारी कार्यालये, मंत्रालय, संसद भवनावरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणला आहे.
राज्य सरकारनेही सोमवारी (ता. 7 फेब्रुवारी) राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यानुसार उद्या (सोमवारी) राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसह शाळा, महाविद्यालयेही बंद राहणार असल्याचे सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे..
याबाबत राज्य सरकारकडून पत्रक जारी करण्यात आलं आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संगीत व कला विश्वाची अपरिमित हानी झाली. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी सोमवारी (ता. 7 फेब्रुवारी) राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचे या पत्रकात नमूद केलं आहे.
The state government has declared a public holiday in the state on Monday, February 7, 2022, to mourn the demise of Bharat Ratna Lata Mangeshkar.
Advertisement— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 6, 2022
दरम्यान, ‘प्रभूकुंज’ निवासस्थानी आज दुपारी 12.30 ते 3 वाजेपर्यंत लतादीदींचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवले होते. त्यानंतर लतादीदींची अंत्ययात्रा निघाली. दीदींचे अंतिम दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विविध क्षेत्रातील दिग्गज यावेळी उपस्थित होते.
संपूर्ण मंगेशकर कुटुंबीय पार्थिवासोबत होतं. शिवाजी पार्कपर्यंत अंत्ययात्रा पोहचल्यानंतर पोलिसांनी लतादीदींना मानवंदना दिली. सायंकाळी सात वाजता शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी प्रत्येक भारतीयांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या.
लता मंगेशकर यांनी 980 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, 20 हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केलं आहे. 2001 साली त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच, 1989 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता.
लतादीदी अजरामर : मुख्यमंत्री
लता दीदी यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला. ‘आपल्या लाडक्या लता दीदी आज आपल्यात नाहीत, हे सून्न करणारं आहे. पण, स्वरांनी, सुरेल गाण्यांनी त्या अजरामर आहेत नि राहतील. जगाचा क्वचितच एखादा कोपरा असेल, जिथे त्यांचा स्वर पोचला नसेल, ऐकला गेला नसेल.’ अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली.