SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

किरीट सोमय्या व शिवसैनिकात पुण्यात जोरदार राडा.. सोमय्या महापालिकेच्या पायऱ्यांवर कोसळले..!

गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या सातत्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहेत. त्यामुळे शनिवारी (ता. 5) पुण्यात साेमय्या यांना शिवसैनिकांच्या रोषाचा सामना करावा लागला.. यावेळी शिवसैनिकांनी केलेल्या धक्काबुक्कीत सोमय्या जखमी झाले असून, पुण्यातील रुग्णालयात त्यांना दाखल केले आहे..

नेमकं काय घडलं..?
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी सोमय्या शनिवारी (ता. 5) पुणे दौऱ्यावर गेले होते. पुणे महापालिका परिसरात अचानक काही शिवसैनिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. सोमय्या यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Advertisement

सोमय्या यांना धक्काबुक्की करण्यात आली. शिवसैनिक त्यांच्या अंगावर धावून जात असल्याचे पाहून सुरक्षा रक्षकांनी सोमय्यांना तिथून तातडीने हलविण्याचा प्रयत्न केला.. या गोंधळात सोमय्या महापालिकेच्या पायऱ्यांवर कोसळले. त्यामुळे त्यांना मोठी दुखापत झाली असून, उपचारासाठी त्यांना पुण्यातील संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Advertisement

काही शिवसैनिक सोमय्या यांच्या अंगावर धावून जात असताना, काही जण त्यांच्या गाडीसमोर आडवे झाले. सोमय्या यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न केला. सोमय्या यांच्या गाडीची काच फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. एक महिला सोमय्या यांच्या गाडीवर चप्पल फेकत असल्याचंही दिसत आहे.

शिवसैनिक काय म्हणतात..?
“शिवसेना नेते संजय राऊत व त्यांच्या कुटुंबावर गेल्या अनेक दिवसांपासून सोमय्या हे आरोप करीत आहेत. त्यांच्या घरात म्हणजेच पुणे महापालिकेत भाजपची सत्ता असून, येथे प्रचंड भ्रष्टाचार होतोय. तो भ्रष्टाचार आम्हाला त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचा होता. त्याबाबत त्यांना निवेदन द्यायचं होतं. त्यासाठी तासभर थांबलो…”

Advertisement

“आमची दिशाभूल केली गेली. ते नवीन गेटला आल्याचे सांगितलं. तिथून आम्ही या ठिकाणी पळत आलो. त्यांच्यासमोर निवेदन केलं. त्यांच्यासमोर पोलिसांनी आम्हाला हुसकावून लावलं. आम्हाला ढकलून दिलं. काही कार्यकर्ते त्यांच्या अंगावर पडल्यामुळे ते इथून पळून गेले. आम्ही पळून त्यांची गाडी अडवली. आम्ही रस्त्यावर झोपलो. त्यांनी आमच्या अंगावर गाडी घातली. आमची शिवसेना पूर्वी जशी काम करीत होती, तसंच काम करील..”, अशी भूमिका शिवसैनिकांनी मांडली.

सोमय्या यांचा आरोप
शिवसेनेच्या गुंडांनी आपल्यावर हा हल्ला केल्याचा आरोप सोमय्या यांनी ट्विटरद्वारे केला आहे. सोमय्या यांच्यावर संचेती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत माहिती माहिती मिळताच पुणे भाजप शहराध्यक्ष योगेश टिळेकर यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्ते रुग्णालयात दाखल झाले होते.

Advertisement

लोकशाहीचा मुडदा पाडू नका : फडणवीस
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. “अशी गुंडागर्दी खपवून घेतली जाणार नाही. लोकशाहीचा मुडदा पाडू नका..,” अशा शब्दांत त्यांनी ट्विटरवर आपला संताप व्यक्त केला आहे.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://jio.sh/spreadit

Advertisement