SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘झिरो बजेट’ शेती म्हणजे काय..? ती कशी करायची, शेतकऱ्यांचा काय फायदा होणार, वाचा सविस्तर..!

मोदी सरकारने 2019 मध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पात ‘झिरो बजेट’ शेतीच्या संकल्पनेचा उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने ‘झिरो बजेट’ शेतीबाबत बोलत आहेत. मात्र, देशभरातील शेतकरी अजूनही या संकल्पनेबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसते..

या पार्श्वभूमीवर ‘झिरो बजेट’ शेती म्हणजे नेमकं काय, ती कशी करायची नि त्याचा शेतकऱ्यांचा काय फायदा होणार, असे अनेक प्रश्न तुमच्यासमोर निर्माण झालेले असतील. चला तर मग याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..!

Advertisement

‘झिरो बजेट’ शेती म्हणजे…
शेतीतील उपलब्ध साधन सामुग्रीवरच शेती करणे, म्हणजे ‘झिरो बजेट’ शेती..! शेतकऱ्याने बियाणे, खते घरीच तयार करायचं, बैलजोडीने शेती कसायची. गोमूत्र, लिंबोळीच्या अर्कापासून कीटकनाशके तयार करायची. घरात बैलजोडी, गाय असणं बंधनकारक. शेतात आंतर मशागत करायची नाही. शेतातला पालापाचोळा शेतात कूजू द्यायचा. मिश्र पीक पद्धती अवलंबायची.

‘झिरो बजेट’ शेती पद्धतीमुळे शेतकऱ्याला बाजारातून कोणतीही खते, कीटकनाशके, रसायने खरेदी करण्याची गरज नाही. पिकांच्या सिंचनासाठी पाणी आणि वीजही सध्याच्या तुलनेत केवळ 10 टक्के खर्च केली जाणार. या शेतीमुळे उत्पादनखर्च कमी होईल, कमी खर्चात जास्त उत्पादन मिळेल. उत्पादनाचा दर्जा चांगला असल्याने बाजारात भावही चांगला मिळेल.

Advertisement

‘झिरो बजेट’ नैसर्गिक शेतीचा शोध महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील रहिवाशी व माजी कृषी शास्रज्ञ सुभाष पाळेकर यांनी लावलाय. “उत्पादन खर्च शून्य, म्हणूनच त्याला ‘झिरो बजेट’ शेती म्हणता येईल. हे एक तंत्र आहे.. अशी शेती सध्या भारतात 40 लाख शेतकरी करतात नि त्यापैकी कोणीही आत्महत्या केलेली नाही..” असं पाळेकर सांगतात. नैसर्गिक शेतीतील योगदानासाठी पाळेकर यांना 2015 साली ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय.

‘झिरो बजेट’ शेतीचे चार स्तंभ

Advertisement

जीवामृत
बॅरलमध्ये 200 लिटर पाण्यात 10 किलो शेण, 5 ते 10 लिटर जूने गोमूत्र, 2 किलो डाळीचे पीठ, 2 किलो ब्राऊन शुगर व चिकण माती मिसळा. हे मिश्रण 48 तास सावलीत ठेवल्यानंतर त्याचे जीवामृत तयार होते.. एक एकरासाठी 200 लिटर जीवामृत लागते. पिकांवर महिन्यातून दोनदा जीवामृताची फवारणी करावी लागते. सिंचनाच्या पाण्यात मिसळूनही ते पिकांवर फवारु शकता.

बीजामृत
नवीन रोपांच्या बियांच्या लागवडीदरम्यान बीजामृताचा वापर होतो. हे तयार करताना शेण, बुरशीनाशक, गोमूत्र, लिंबू नि माती वापरली जाते. कोणतेही पीक पेरण्यापूर्वी त्या बियांमध्ये बीजामृत चांगले टाकावे. बियाणे सुकल्यानंतर पेरावे. बीजामृताने नवीन रोपांची मुळे मजबूत होतात. मातीजन्य रोगांपासून पिकाचे संरक्षण होते..

Advertisement

मल्चिंग
जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी, जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी मल्चिंगचा वापर केला जातो. मातीच्या पृष्ठभागावर विविध साहित्य वापरले जाते. मल्चिंगचे तीन प्रकार आहेत – माती मल्चिंग, भूसा मल्चिंग आणि लाईव्ह मल्चिंग.

वापसा
झाडांना वाढण्यासाठी जास्त पाणी लागत नाही, वाफेच्या मदतीनेही झाडे वाढू शकतात. वापसा ही अशी स्थिती आहे, ज्यात हवेचे रेणू असतात आणि या दोन रेणूंच्या मदतीने वनस्पती वाढत असल्याचे पालेकर यांचे म्हणणे आहे..

Advertisement

‘झिरो बजेट’ शेतीचे फायदे
– शेतकऱ्याला रासायनिक औषधे खरेदी करावी लागत नाही.. त्यामुळे खर्च कमी येतो.
– झिरो बजेट नैसर्गिक शेतीमुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते आणि पिकांचे उत्पादन चांगले मिळते.
– शेतकऱ्याने बनवलेल्या खतांचा वापर केला जातो. त्यामुळे कमी खर्च आल्याने पिकातून जास्त नफा मिळतो.
– नैसर्गिक साधनांच्या वापरामुळे पिकाचे चांगले उत्पादन मिळते. शिवाय मालाची गुणवत्ता वाढते. त्याचे सेवन आरोग्यासाठी फलदायी ठरते.

🎯 अशाच ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन WhatsApp वर Free मिळवण्यासाठी क्लिक करा

Advertisement