भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी, विशेषत: ‘कॅप्टन कुल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महेंद्रसिंग धोनीच्या फॅनसाठी एक खास बातमी आहे.. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून धोनी निवृत्त झाला असला, तरी त्याची क्रेझ अजूनही कमी झालेली नाही.. क्रिकेटचे मैदान गाजविल्यानंतर धोनी आता नव्या भूमिकेत दिसणार आहे..
भारताचा हा सर्वात यशस्वी कॅप्टन.. क्रिकेटच्या मैदानावर धोनीने अखेरच्या क्षणापर्यंत कधीही हार मानली नाही. अनेक अशक्यप्राय वाटणारे सामने त्याने आपल्या एकट्याच्या जोरावर लिलया जिंकून दिले.. एखाद्या योद्ध्यासारखा तो शेवटपर्यंत लढत असे.. आता क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर तो एका योद्ध्याच्या रुपातच समोर आला आहे..
धोनीचे नव्या क्षेत्रात पदार्पण
क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या इनिंग खेळल्यानंतर आता धोनीने (MS Dhoni) नव्या क्षेत्रात पदार्पण केलं आहे. लवकरच तो एका ‘ग्राफिक नॉव्हेल’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नॉव्हेलचा ‘फर्स्ट लूक’ नुकताच धोनीने ‘फेसबूक अकाऊंट’वर शेअर केलाय.
‘अथर्व: द ओरिजिन’ (Atharva: The Origin) असे या ‘ग्राफिक’ कादंबरीचे नाव आहे.. धोनीने शेअर केलेल्या ‘फर्स्ट लूक’ व्हिडीओमध्ये धोनी युद्धभूमीवर अॅनिमेटेड अवतारात एका योद्ध्याच्या रुपात दिसत आहे. धोनीचे हे अॅनिमेटेड पात्र राक्षसासारख्या सैन्याविरुद्ध लढताना दिसतेय. धोनीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
धोनी काय म्हणाला..?
धोनीची ही ग्राफिक कादंबरी लेखक रमेश थमिलमणी यांनी लिहिली आहे. तर या ग्राफिक नॉवेलची निर्मिती ‘विर्जू स्टुडिओज्’ (Virzu Studios) आणि ‘मिडास् डिल्स प्रा. लि.'(MIDAS Deals) यांनी केली आहे.
या नॉव्हेलबद्दल बोलताना धोनी म्हणाला, की “या प्रोजेक्टसाठी मी खूप उत्साही आहे. ‘अथर्व- द ओरिजिन’ हे एक आकर्षक नॉव्हेल आहे. त्यात ‘आर्ट वर्क’ केलंय. गेली काही वर्षे या नॉव्हेलच्या निर्मितीचे काम सुरू होते.” आता या नॉवेलचा ‘फर्स्ट लूक’ पाहून धोनीचे चाहते हे ‘नॉव्हेल’ रिलीज होण्याची वाट पाहात आहेत.