केंद्रिय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मोदी सरकार लवकरच या कर्मचाऱ्यांना बंपर गिफ्ट देणार आहे. ते म्हणजे, लवकरच केंद्रिय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात घसघशीत वाढ केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे..
अर्थ मंत्रालयाने कोरोना महामारीमुळे 30 जून 2021 पर्यंत महागाई भत्त्यात (DA) वाढ केली नव्हती. त्यामुळे 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 पर्यंत महागाई भत्ता 17 टक्के होता. त्यानंतर मोदी सरकारने जुलै 2021 मध्ये महागाई भत्त्यात वाढ करुन 28 टक्के केला. त्यानंतर ऑक्टोबर-2021 मध्ये परत सरकारने महागाई भत्ता वाढवून 31 टक्के केला..
अवघ्या तीन महिन्यांत पुन्हा एकदा मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यानुसार, आता महागाई भत्ता 34 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. शिवाय, घरभाडे भत्त्यातही (HRA) मोठ्या प्रमाणात वाढ केली जाणार असल्याचे सांगण्यात येते..
एआयसीपीआय (AICPI) निर्देशांक, औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे 2001 नुसार, डिसेंबर-2021 साठी निर्देशांकात एक अंकाची घट झाल्याने निर्देशांक 361 अंकांवर गेला आहे. महागाई भत्त्यासाठी 12 महिन्यांचा सरासरी निर्देशांक 351.33 आहे. या सरासरी निर्देशांकावर 34.04 टक्के महागाई भत्ता मिळू शकतो.
कधीपासून मिळणार..?
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, मूळ वेतनावर महागाई भत्ता दिला जातो. सध्या 31 टक्के महागाई भत्ता मिळतो. आता जानेवारी-2022 पासून 3 टक्के महागाई भत्ता वाढणार असून, एकूण महागाई भत्ता 34 टक्के होणार आहे. लवकरच त्याची घोषणा केली जाणार असून, मार्चनंतर त्याची अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे.
मोदी सरकारच्या महागाई भत्त्यात वाढ केल्यास देशातील 50 लाख केंद्रीय कर्मचारी व 65 लाख पेन्शनधारकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. त्याच वेळी या कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ताही वाढणार असल्याने पगारात मोठी वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे..