SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पतीच्या मृत्यूपत्राद्वारे मिळालेल्या संपत्तीवर पत्नीचा हक्क किती..? सुप्रिम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय..!

भारतात संपत्ती हक्काबाबतच्या कायद्याबाबत नागरिकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. या कायद्यांबाबत पुरेशी माहिती नसल्याने संपत्तीच्या मालकी हक्कावरुन अनेकदा वाद होतात. हे वाद कोर्टात जातात नि वर्षानुवर्षे सुरु राहतात. त्यातून अखेर अनेकांच्या पदरी निराशाच पडते..

अशाच एका गैरसमजाबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. ते म्हणजे, पतीच्या मालमत्तेत किंवा पतीच्या पालकांच्या मालमत्तेवर महिलेचा हक्क असल्याचा एक गैरसमज नागरिकांमध्ये आहे.. मात्र, याबाबत नुकताच सुप्रिम कोर्टाने स्पष्ट निर्णय दिला आहे. नेमकं हे काय प्रकरण होतं, सुप्रिम कोर्टाने त्यावर काय निर्णय दिला, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..!

Advertisement

नेमकं प्रकरण काय..?
हे प्रकरण हरियाणामधील आहे. तेथील जुंडला गावातील रहिवासी असलेले तुलसी राम यांनी 15 एप्रिल 1968 रोजी मृत्यूपत्र तयार केले होते. त्यानंतर पुढील वर्षी 17 नोव्हेंबर 1969 ला त्यांचा मृत्यू झाला. तुलसी राम यांनी आपल्या मृत्यूपत्रात त्यांची अचल संपत्ती दोन भागांत वाटली होती.

एक भाग पहिल्या पत्नीच्या मुलाला, तर दुसरा भाग दुसऱ्या पत्नी राम देवी यांच्या नावे केला होता. तुलसी राम यांनी मुलाच्या नावे निम्मी संपत्ती पूर्ण मालकी हक्काने दिली होती, परंतु दुसऱ्या पत्नीला तिचे पालन-पोषण होईल, या उद्देशाने सीमित संपत्ती दिली होती. तसेच, दुसऱ्या पत्नीच्या मृत्यूनंतर तिला दिलेल्या संपत्तीवरही मुलाचा हक्क येईल, असे नमूद केले होते.

Advertisement

दरम्यान, नंतरच्या काळात राम देवी हिने आपल्याला मिळालेली संपत्ती विकली. त्यावर सावत्र मुलाने पंजाब व हरियाणाच्या हायकोर्टात याचिका दाखल केली. मात्र, हायकोर्टाने रामदेवी यांच्या बाजूनेच निकाल दिला होता. त्याविरोधात मुलाने सुप्रिम कोर्टात अपिल केले.

सुप्रिम कोर्टाने काय म्हटलंय..?
सुप्रिम कोर्टात न्यायमूर्ती संजय किशन कौल व न्यायमूर्ती एम.एम. सुंदरेश यांच्या खंडपीठापुढे त्यावर नुकतीच सुनावणी झाली. त्यात या खंडपीठाने महत्वपूर्ण निकाल दिला.

Advertisement

“स्वत: कमाविलेल्या संपत्तीचा मालक हिंदू पुरुष असेल आणि त्याने जरी मृत्यूपत्राद्वारे ती संपत्ती पत्नीला दिली असेल, तरी ती पत्नी त्या संपत्तीचा पूर्ण मालक होत नाही. पतीने आपल्या मृत्यू पश्चात पत्नीचा खर्च भागण्यासाठी योग्य तरतूद केली, तर मृत्यूपत्राद्वारे दिलेल्या संपत्तीवर पत्नीचा पूर्ण हक्क राहत नाही..,” असा निकाल खंडपीठाने दिला..

सुप्रिम कोर्टाने पंजाब व हरियाणा हायकोर्टाचा निकाल रद्द ठरवला. राम देवीकडून संपत्ती विकत घेणाऱ्यांचा या संपत्तीवर कोणताही हक्क उरत नाही. त्यांच्या बाजूने खरेदीखत कायम केले जाऊ शकत नाही. राम देवीला सीमित मृत्यूपत्राद्वारे मिळालेली संपत्ती विकण्याचा हक्क नव्हता किंवा ती दुसऱ्याच्या नावे हस्तांतर करू शकत नव्हती, असे सुप्रिम कोर्टाने आपल्या आदेशात नमूद केले आहे..

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा 

Advertisement