रोहित शर्माचा पोलार्डच्या संघाला एका वाक्यात इशारा, ‘टीम इंडिया’साठी पहिली वन-डे ‘या’ कारणाने खास..!
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील वन-डे मालिकेला 6 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणारा हा सामना भारतासाठी खास असणार आहे. कारण, हा भारताचा 1000 वा सामना असेल.. त्यामुळे टीम इंडियासाठी या सामन्याचे वेगळे वैशिष्ट्य आहे..
आतापर्यंत भारतीय संघ 999 वन-डे सामने खेळला आहे. त्यात 518 सामने जिंकले असून, 461 सामन्यांत पराभव झाला आहे. 41 सामन्यांचा निकाल लागलेला नाही. त्यामुळे भारताच्या विजयाची टक्केवारी 54.54 एवढी आहे.
पूर्ण वेळ कर्णधार झाल्यानंतर रोहित शर्मा प्रथमच वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानावर टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधीच विराट कोहलीकडून रोहित शर्माकडे वन-डेचे कर्णधारपद सोपवले होते, मात्र दुखापतीमुळे रोहित शर्मा या दौऱ्यातून बाहेर पडला होता.
आतापर्यंत रोहितने 10 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केलंय. त्यात त्याने 8 सामने जिंकले असून, 2 सामन्यांत पराभव झाला आहे. नव्या वर्षाची सुरुवात टीम इंडिया मालिका विजयाने करण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे रोहित शर्माकडून चाहत्यांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
दरम्यान, वेस्ट इंडिजचा संघही उत्साही आहे. वेस्ट इंडिजने घरच्या मैदानावर झालेल्या 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडच्या तगड्या संघाला 3-2 अशी धूळ चारलीय.. त्यामुळे टीम इंडियाला वेस्ट इंडिज संघाकडून तगडे आव्हान मिळण्याची शक्यता आहे.. वेस्ट इंडिजचा संघ भारतात दाखल झाला आहे.
AdvertisementView this post on Instagram
Advertisement
रोहितचा मित्राला इशारा..
रोहित शर्मा याने वन-डे मालिका सुरु होण्यापूर्वीच आपल्या मित्राला (पोलार्ड) जोरदार इशारा दिला आहे. वेस्ट इंडिजचा संघ भारतात दाखल होताच, रोहितने ‘इन्स्टाग्राम’वर एक पोस्ट केलीय. त्यात त्याने सामना खेळण्यासाठी आपण किती अधीर झालोय, हे त्याने दाखवून दिलं आहे. ‘आता आणखी वाट पाहू शकत नाही..,’ असे रोहितने आपल्या संदेशात म्हटलं आहे.
खरे तर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा व वेस्ट इंडिजचा कॅप्टन कायरान पाेलार्ड हे गेल्या कित्येक वर्षांपासून ‘आयपीएल’मध्ये ‘मुंबई इंडियन्स’ संघाकडून खेळतात. त्यामुळे त्यांच्यातील दोस्ती साऱ्यांनाच माहिती आहे.. मात्र, आता हे दोन्ही खेळाडू एकमेकांविरुद्ध मैदानावर उतरणार असून, त्यावेळी त्यांच्यात जोरदार टशन पाहायला मिळू शकते..