SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नितेश राणे अखेर सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात शरण, संतोष परब यांच्यावरील जीवघेणा हल्ला प्रकरण

सिंधुदूर्ग येथील शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नीतेश राणे अखेर आज सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाला शरण आले. सत्र न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.

दरम्यान, त्यानंतर लगेच नीतेश राणे यांच्याकडून जामिनासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले. दुसरीकडे सरकारी पक्षाने राणे यांना 5 दिवसांची पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली आहे. त्यावर न्यायालयाने पोलिसांना त्यांचे म्हणणं मांडण्यासाठी नोटीस पाठविल्याची माहिती मिळाली.

Advertisement

या प्रकरणात अटकपूर्व जामीनासाठी नितेश राणेे यांनी सुप्रिम कोर्टापर्यंत धाव घेतली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळला होता. मात्र, त्याच वेळी त्यांना अटकेपासून 10 दिवसांचे संरक्षण दिले होते. या 10 दिवसांत त्यांनी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयापुढे शरण जावे, असे निर्देशही सुप्रीम कोर्टाने दिले होते.

नियमित जामीनासाठी राणे यांनी सत्र न्यायालयातच अर्ज करावा, असेही निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते. मात्र, सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने त्यांचा नियमित जामीनअर्जही फेटाळून लावला. त्यानंतर राणे यांना अटक केली जाणार असल्याचे दिसत होते. त्यावरुन काल (ता. 1) न्यायालयाबाहेर मोठा गोंधळही उडाला होता..

Advertisement

नियमित जामिनासाठी नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नंतर आज अचानक त्यांनी आपला निर्णय बदलत जिल्हा सत्र न्यायालयाला शरण जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते शरण गेल्यानंतर सत्र न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.

सरकारी पक्षाने या घटनेच्या चौकशीसाठी नितेश राणे यांना 5 दिवसांची पोलिस कोठडी मागितली आहे. त्यावर न्यायालयाने पोलिसांना त्यांचे म्हणणं मांडण्यासाठी नोटीस पाठविली आहे.

Advertisement

नेमकं प्रकरण काय..?
काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक झाली. निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना, कणकवली येथे 18 डिसेंबर 2021 रोजी दोघांनी चाकूने शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर वार केले होते. त्यात परब गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुते याला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक केली..

आरोपी सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी नितेश राणे यांच्याविरुद्धही कलम 307 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर अनेक दिवस राणे पोलिसांना सापडत नव्हते.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ जॉईन करण्यासाठी क्लिक करा

Advertisement