राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची होणारी वाढ कमी होत असल्याचं दिसतंय आहे. कमी वेळेत जास्त रुग्णवाढ झाल्यानंतर हा आलेख आता घसरला आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितलं होतं. राज्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात आल्याचा दावा सरकारने उच्च न्यायालयातही केला आहे.
सरकारने नवीन वर्ष सुरू होताना 30 डिसेंबरपासूनच राज्यात काही निर्बंध लागू केले होते. मात्र, त्यानंतरही ओमायक्रॉनचा धोका वाढताना दिसल्यावर 10 जानेवारीपासून दिवसा जमावबंदी तर रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली. त्याचप्रमाणे लग्नसमारंभापासून सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांमधील लोकांच्या उपस्थिती संख्येवर निर्बंध लागू करण्यात आले.
कोरोनाची विशेषत: ओमायक्रॉनची लाट नियंत्रणात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध पुन्हा शिथिल करण्याचा निर्णय सोमवारी राज्य सरकारने घेतला. आज (ता. 1 फेब्रुवारी) मंगळवारपासून राज्यात हे नवीन नियम लागू होणार आहेत. याआधीच्या 8 जानेवारीच्या आदेशानुसार, ज्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या डोसचे 90% तर दुसऱ्या डोसचे 70 लसीकरण झाले आहे, अशा जिल्ह्यांना काही अटी आणि शर्थींमध्ये शिथिलता यापूर्वीच देण्यात आली आहे.
कोरोना नियंत्रणात आल्यामुळे राज्यातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न राज्य सरकारने सुरू केला आहे. त्यानुसार शाळा- महाविद्यालये सुरू करण्यात आली असून आता अन्य निर्बंधही शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जाणून घेऊ सरकारने निर्बंधांमध्ये कोणती शिथिलता दिली आहे…
राज्य सरकारची नवीन नियमावली
▪️ लग्नसोहळे व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमाला, खुल्या मैदानात किंवा सभागृहात आता क्षमतेच्या 25 टक्के किंवा जास्तीत जास्त 200 लोकांच्या उपस्थितीची परवानगी
▪️ अंत्यसंस्कारासाठी 20 व्यक्तींची मर्यादा हटविण्यात आली असून, आता उपस्थितीबाबत कोणतीही मर्यादा नाही.
▪️ करमणूक पार्क, थिमपार्क, स्पा, ब्युटी पार्लर, सलून, जलतरण तलाव, वॉटर पार्क 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील.
▪️ उपाहारगृह, नाटय़गृह, चित्रपटगृहे स्थानिक प्राधिकरणाने निर्धारित केलेल्या वेळेत 50 टक्के क्षमतेने, मनोरंजनात्मक कार्यक्रम 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी.
▪️ सर्व राष्ट्रीय प्राणी संग्रहालये आणि सफारी खुले करण्य़ासाठी परवानगी आणि लसीकरण पूर्ण असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश असणार
▪️ सर्व पर्यटन स्थळे ही नियमित वेळेनुसार ऑनलाईन बुकिंगनेच खुली करण्यात आली आहे. तेथे कोरोनाच्या नियमावलीचे पालन करणे गरजेचे
▪️ खेळांसाठी 25 टक्के इतक्या क्षमतेनेच प्रेक्षक उपस्थित राहू शकणार
▪️ हॉटेल, रेस्टॉरंट आणि नाट्यगृहांची वेळ स्थानिक प्रशासन ठरवणार
▪️ कोरोना परिस्थिती पाहता स्थानिक प्राधिकरणाला रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी करण्याचे किंवा याशिवाय इतर निर्बंध लागू करण्याचे अधिकार असणार
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit