भारतीय जवानांविषयी प्रत्येकाच्या मनात एक आदराची, प्रेमाची भावना असते.. ऊन, वारा, पाऊस, थंडी आणि प्रचंड बर्फ अशा कितीतरी संकटाचा सामना करीत हे जवान डोळ्यात तेल घालून सर्वसामान्य नागरिकांच्या संरक्षणासाठी सतत सज्ज असतात. त्यामुळेच देशातील नागरिक शांत चित्ताने झोपू शकतात.
भारतीय सैन्य दलात भरती (Indian Army recruitment) होऊन देशसेवा करण्याचे अनेकांचे स्वप्न असतं.. अगदी लहानपणापासून अनेकांना वाटतं, की आपणही सैन्यात जावून शत्रूशी दोन हात करावेत. मात्र, हे स्वप्नं इतकं सोपे नाही. त्यामागे प्रचंड मेहनत, कष्टाची तयारी लागते.. भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी वेगवेगळ्या दिव्यांतून पार व्हावे लागते.. तेव्हा कुठे ‘आर्मी’ची वर्दी अंगावर चढते..
अनेकांना भारतीय लष्करात जाण्याची इच्छा तर असते, मात्र त्यासाठी काय करायला लागेल? नक्की कोणत्या ‘टेस्ट’ द्याव्या लागतील, याची काहीच माहिती नसते.. चला तर मग याबाबत सविस्तर जाणून घेऊ या…!
भारतीय लष्करात भरती होण्यासाठी दरवर्षी प्रक्रिया होत असते.. गेल्या वर्षीपासून ही प्रक्रियाही ऑनलाइन झालीय. ऑनलाइन फॉर्म भरल्यानंतर शारीरिक, वैद्यकीय नि लेखी परीक्षेला सामोरे जावे लागते.. त्यातून गुणवत्ता यादी तयार होते नि तुमच्या गुणांच्या आधारे सैन्यात निवड होते..
शारीरिक चाचणी (Physical test)
1600 मीटर रनिंग : अर्जदाराला गट 1 मध्ये 5.40 सेकंद, गट 2 मध्ये 5.41 सेकंद ते 6.20 सेकंद मिळतात, जे निर्धारित वेळेत पूर्ण करावे लागतात. त्यासाठी विहित संख्या गट 1 साठी 60 आणि गट 2 साठी 48 आहेत.
पुल अप बीम : अर्जदाराला जितके जास्त पुल अप्स मिळतील, तितके जास्त नंबर मिळतात. त्यासाठी जास्तीत जास्त 40 संख्या निश्चित केली जाते, जी जास्तीत जास्त 10 पुल केल्यानंतर मिळते.
लांब उडी : अर्जदाराला किमान 9 फूट लांब उडी मारावी लागते. त्यात उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
शरीर संतुलन: या चाचणीतही अर्जदार उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.
वैद्यकीय चाचणी (Medical test)
शारीरिक चाचणीनंतर उमेदवारांची वैद्यकीय चाचणी होते. त्यात तुमचा शारीरिक फिटनेस पाहिला जातो. शिवाय इतर काही वैद्यकीय चाचण्या केल्या जातात. त्यातून तुम्ही पूर्ण तंदुरुस्त असल्याचे सिद्ध होणे गरजेचे आहे..
लेखी परीक्षा (Written test)
शारीरिक व वैद्यकीय चाचणीनंतर उमेदवाराला एक लेखी परीक्षा द्यावी लागते. लिपिक, लघुलेखक, स्टोअर कीपर, सहायक आदी पदांसाठी ही चाचणी अधिक महत्त्वाची आहे. या परीक्षेतील गुणांच्या आधारेच गुणवत्ता यादी तयार केली जाते. त्यात उत्तीर्ण होणाऱ्यांची निवड केली जाते..
भारतीय लष्करात भरती होण्यासाठी अशा वेगवेगळ्या चाचण्या पार कराव्या लागतात. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवाराला लष्कराचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करावे लागते. त्यानंतर त्याला देशसेवेसाठी हजर करुन घेतले जाते.