SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

इंस्टाग्रामवरील ‘थेरगाव क्वीन’ला अटक, व्हिडीओमध्ये करत होती शिवीगाळ, नेमकं काय घडलं?

इंस्टाग्रामवर अश्लील भाषा आणि धमकीचे व्हीडिओ पोस्ट करणाऱ्या तरुणींना पिंपरी-चिंचवडच्या पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील वाकड पोलिसांनी इंस्टाग्रामवर ‘थेरगाव क्वीन’ नावाने अकाउंट चालवणाऱ्या दोन मुलींना अटक केली आहे. अश्लील भाषेसह धमकीचे व्हिडीओ पोस्ट केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

इंस्टाग्रामवर ‘थेरगाव क्वीन’ नावाने अकाउंट

Advertisement

इंस्टाग्रामवर ‘थेरगाव क्वीन’ नावाने साक्षी श्रीश्रीमलचे अकाउंट असून, त्यावर तिचे मित्र आणि मैत्रिणीसोबतचे काही अश्लील भाषेमधील व्हिडीओ, धमकीचे व्हिडिओ पोस्ट केल्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police Arrested Thergaon Queen) बेड्या ठोकल्या आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…

Advertisement

आरोपी साक्षी श्रीश्रीमल हिचे इंस्टाग्रामवर थेरगाव क्वीन नावाचे अकाउंट आहे. त्यावर साक्षी श्रीश्रीमल, साक्षी कश्यप आणि कुणाल कांबळे हे अत्यंत अश्लील भाषेत, शिव्या देऊन डायलॉग्जचा समावेश असणारे रिल्स आणि धमकीचे व्हिडिओ बनवून ते इंस्टाग्रामवर पोस्ट करत असल्याची माहिती आणि त्यांचा व्हिडिओ वाकड पोलिसांना मिळाला होता. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक संगीता गोडे यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या मोबाईलवर काही इंस्टाग्राम व्हिडीओ प्राप्त झाले.

थेरगाव क्वीन’ या नावाने अकाउंट चालविणारी साक्षी हेमंत श्रीश्रीमल (रा. थेरगाव), साक्षी राकेश कश्यप (रा. चिंचवड) अशी नावे असणाऱ्या तरुणींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर कुणाल कांबळे (रा. गणेश पेठ) याच्यावर माहिती तंत्रज्ञानासह इतर कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. यात सार्वजनिक ठिकाणी अश्लील भाषा व शब्द वापरलेले व्हिडीओ तयार केल्याचे निष्पन्न झाले. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संगीता गोडे यांनी केली आहे.

Advertisement

अनेक दिवसांपासून अश्लील भाषेचा वापर करून तयार केलेल्या व्हिडीओने सोशल मिडीयावर अक्षरश: धुमाकूळ घातला. त्यांचे अनेक फॅन्स असणाऱ्या यूजर्सकडून त्यांच्या ऑडिओवर व्हिडीओ बनवून व्हायरल केले जात आहेत, सध्या सर्व स्तरांतून याबाबत संताप व्यक्त केला जात असल्याने अखेर पोलिसांनी तातडीने पावले उचलत तिघांवर गुन्हा दाखल करून यातील दोन तरुणींना अटक केल्याचं समजतंय. आता यांसारखेच इतर व्हिडीओ बनवणाऱ्या युजर्ससाठी हा जणू एक इशाराच मानला जात आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement