SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजे..’ औरंगाबादमध्ये बॅनर लावणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल..!

प्रसिद्धीसाठी काेण काय करील, याचा भरवसा राहिलेला नाही.. त्यासाठी अनेक जण कोणत्याही थराला जायलाही तयार असतात. सोशल मीडियामुळे अनेकांनी प्रसिद्धीचे व्यसनच लागले आहे. त्यातून एखादी व्यक्ती अवघ्या काही क्षणात प्रसिद्धीच्या झोतात येते.. मात्र, कधी कधी अशी प्रसिद्धी अंगलटही येण्याची शक्यता असते..

असाच काहीसा प्रकार औरंगाबादमधून समोर आला आहे.. औरंगाबादमधील 35 वर्षीय व्यक्ती आपल्या एका आगळ्या-वेगळ्या बॅनरमुळे चर्चेत आली. ‘निवडणूक लढवण्यासाठी आपल्याला बायको हवी..’ असा बॅनर या व्यक्तीने औरंगाबाद शहरातील गुलमंडी भागात लावला होता..

Advertisement

रमेश पाटील, असे या व्यक्तीचे नाव.. “मला तीन मुले असल्याने, मी निवडणूक लढवू शकत नाही. त्यामुळे मला निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे..” असा मजकूर या बॅनरवर होता. त्याखाली पाटील यांचे नावही होतं.. कोणीतरी या बॅनरचा फोटो सोशल मीडियावर टाकला नि काही वेळेतच अवघ्या महाराष्ट्रभर पसरला.

विशेष म्हणजे, पाटील यांनी या जाहिरातसोबतच काही अटी-शर्तीही ठेवल्या होत्या. त्यात ‘जातीची कोणतीही अट असणार नाही. महिलेचे वय 25 ते 40 वर्षे असावे. अविवाहित, विधवा, घटस्फोटीत महिलाही चालेल, पण दोन पेक्षा अधिक मुले नकोत,’ असे बॅनरवर म्हटले होते.. हे बॅनर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्यावर कमेंटचा पाऊस पडला.

Advertisement

पाटीलविरुद्ध गुन्हा दाखल
दरम्यान, रमेश पाटील यांना आता अशी बॅनरबाजी करणे महागात पडण्याची शक्यता आहे. औरंगाबाद महापालिकेचे अधिकारी प्रकाश आठवले यांच्या आदेशावरून स्वच्छता निरीक्षक मोहाडे यांनी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात पाटील यांच्याविरुद्ध तक्रार दिली असून, त्यानुसार त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिला आयोग आक्रमक
पाटील यांनी सकाळी गुलमंडीत हे बॅनर लावल्यानंतर संध्याकाळी भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्यावर शाई फेकून या वृत्तीचा जोरदार निषेध केला. ‘निवडणूक लढवण्यासाठी महिलांचा असा अपमान सहन करणार नाही..’ असा इशारा महिलांनी दिला.

Advertisement

पाटील यांच्या बॅनरमुळे महिलांचा अवमान होत असून, या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. औरंगाबाद शहराचे पोलिस आयुक्तांना तपास करून याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ जॉईन करण्यासाठी क्लिक करा

Advertisement