मोबाईल वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. सेवेच्या नावाखाली ग्राहकांची लूट करणाऱ्या टेलिकाॅम कंपन्यांना भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरण.. अर्थात ‘ट्राय’ने (TRAI) चांगलाच दणका दिला आहे. दूरसंचार कंपन्यांच्या मनमानी कारभाराला ‘ट्राय’ने चाप लावला आहे.
सध्या टेलिकॉम कंपन्या प्रीपेड सेगमेंटमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह रिचार्ज प्लॅन देतात. त्यामुळे ग्राहकांना एका वर्षात 13 रिचार्ज करावे लागतात. वर्षाकाठी एका जादा रिचार्जच्या माध्यमातून या कंपन्या कोट्यवधी रुपये कमावत असल्याचे समोर आले आहे..
आता 30 दिवसांचे प्लॅन
याबाबत मागील काही दिवसांत अनेक यूजर्सकडून ‘ट्राय’कडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्याची दखल घेत, ‘ट्राय’ने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, टेलिकॉम कंपन्यांना प्रीपेड ग्राहकांसाठी आता 30 दिवसांची वैधता असणारे रिचार्ज प्लॅन्स द्यावे लागणार आहेत. तसा आदेश ‘ट्राय’ने या कंपन्यांना दिला आहे. त्यामुळे ग्राहकांना वर्षाकाठी एक रिचार्ज कमी करावा लागेल.
“प्रत्येक दूरसंचार सेवा पुरवठादार कंपनी किमान एक प्लॅन व्हाउचर, एक विशेष टॅरिफ व्हाउचर आणि 30 दिवसांच्या वैधतेसह कॉम्बो व्हाउचर देईल. सर्व प्लॅनच्या नूतनीकरणाची तारीख पुढील महिन्यातही तीच राहिल, म्हणजे दिवस कमी न करता पुढील महिन्यात त्याच दिवशी रिचार्जची तारीख येईल, यासाठी दूरसंचार कंपन्यांनी खात्री करावी, असे ‘ट्राय’ने स्पष्ट केले आहे.
सरसकट आदेश लागू नाही…
दरम्यान, टेलिकाॅम कंपन्यांच्या सर्वच प्लॅनसाठी हा आदेश लागू नाही. एसएमएस, कॉलिंग, डेटा असा सगळा प्लॅन लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. स्वतंत्र प्लॅनसाठी हा नियम लागू नसेल. एक किंवा त्यापेक्षा अधिक ऑफर लागू असेल, तर हा नियम लागू असेल. ग्राहकांना इतर प्लॅन 28 दिवस, 56 दिवस आणि 84 दिवसांचेच घ्यावे लागणार आहेत..
दूरसंचार कंपन्यांनी रिचार्ज प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेऐवजी 30 दिवसांचे करावेत.. दिवसांच्या वैधतेबाबत लपवाछपवी करु नये, कारण ग्राहकांचे हितसंरक्षण करणे महत्त्वाचे असल्याचे ‘ट्राय’ने म्हटले आहे..
दरम्यान, ‘ट्राय’च्या या निर्देशानंतर दरमहा त्याच तारखेला ग्राहकांना रिचार्ज करता यावे, यासाठी टेलिकॉम कंपन्यांना त्यांच्या सिस्टिममध्ये बदल करावे लागणार आहेत. तसेच स्वतंत्र प्लॅन आणि ऑफरसाठीही सिस्टिममध्ये बदल करावे लागतील. त्यासाठी कंपन्यांना वेळ लागणार आहे. त्यामुळे ‘ट्राय’ने कंपन्यांना 60 दिवसांचा कालावधी दिला आहे.