SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

कुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा दशक्रिया नि तेरावा विधी, संगमनेरातील घटना..

भारतीय संस्कृतीत माणसाचे प्राण्यांसोबत असलेलं नातं शब्दांत सांगता येत नाही.. या प्राण्यांवरही कुटुंबातील सदस्याप्रमाणेच प्रेम केले जाते.. मग कधी एखाद्या गायीचे डोहाळे जेवण घातले जाते, तर कधी वासराचा बारशाचा सोहळा.. कधी आवडत्या प्राण्याच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार व विविध विधी केल्याचे पाहायला मिळते.

अहमदनगर जिल्ह्याील संगमनेर तालुक्यात नुकताच अशीच घटना समोर आलीय. एका पशूपालकाने आपल्या लाडक्या बैलाच्या मृत्यूनंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार तर केलेच, शिवाय दशक्रिया व तेरावा विधीही पूर्ण केला. या प्रकाराची सर्वत्र चर्चा होत आहे.

Advertisement

नेमकं काय घडलं..?
संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील माळेगाव पठार या गावाअंतर्गत धादवडवाडी ही मोजक्या लोकसंख्येची वस्ती.. येथील पशूपालक महादू मारुती खराटे यांच्याकडे ‘भाग्या’ नि ‘राजा’ची बैलजोडी होती. खराटे कुटुंबाच्या वाईट काळात या बैलजोडीची त्यांना मोठी मदत झाली.. नंतर दिवस फिरले.. कुटुंबाने प्रगतीची वाट धरली..

खराटे कुटुंबाच्या प्रगतीत या ‘भाग्या-राजा’ जोडाचा महत्त्वचा वाटा होता. खराटे कुटुंबीयदेखील त्यांच्यावर घरातील सदस्यांप्रमाणेच प्रेम करीत. त्यामुळे सर्वांना त्यांचा लळा लागला होता. अगदी लहान मुलांप्रमाणेच त्यांचे लाड केले जात.. बैलपोळ्याला तर विचारु नका… बैलांना आकर्षक सजावट करुन वाजत-गाजत गावातून त्यांची मिरवणूक काढली जात असे..

Advertisement

काही दिवसांपूर्वीच वृद्धापकाळाने या जोडीतील लाडक्या ‘भाग्या’चा मृत्यू झाला.. घरातील सदस्य गेल्याप्रमाणेच खराटे कुटुंबाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या.. कुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या ‘भाग्या’वर खराटे कुटुंबाने विधीवत अंत्यसंस्कार केले.. इतकेच नाही, तर नंतर दशक्रिया व तेरावा विधीदेखील केला..

यानिमित्त मनोहर महाराज खराटे यांचे प्रवचन झाले. त्यात त्यांनी ‘भूत दया गायी पशूंचे पालन, तान्हेल्या जीवन वना माजी’ उक्तीनुसार उपस्थितांना प्रबोधन केले. नंतर उपस्थित सर्वांना भोजन देण्यात आले. बैलावरील अनोख्या प्रेमाची कहाणी पंचक्रोशीत झाली.

Advertisement

“माणसांप्रमाणे प्राणीदेखील आपल्याला भक्कम साथ देतात, याची अनुभूती आम्हाला आली. खराटे कुटुंबाच्या प्रगतीत लाडक्या ‘भाग्या’चा वाटा मोठा होता. तो आमचा लाडका सदस्य होता. त्याच्यावरील प्रेमापोटीच हे सारे काही केले…” असे पशूपालक महादू खराटे यांनी सांगितले.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Advertisement