दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुन याचा ‘पुष्पा’ या सिनेमाने देशभर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटातील संगीत, गाणी, डायलॉग्स प्रत्येकाच्या तोंडपाठ झाले आहेत. कोरोनाचे संकट असतानाही बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करण्यात हा चित्रपट यशस्वी झाला आहे.
खरं तर भारतीय सिनेमाचा गुन्हेगारी हा सगळ्यात फेव्हरेट विषय.. कधी सोने, तर कधी ड्रग्जची स्मगलिंग नि त्यातून जन्म घेणारी गुन्हेगारी.. अशा विषयांवर याआधी ढिगाने सिनेमे आले नि त्यांना प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला.. पण ‘पुष्पा’ सिनेमाची कथा काहीसी वेगळी आहे..
पुष्पा सिनेमाची कथा लाल चंदन.. अर्थात रक्त चंदनाच्या तस्करीवर बेतलेली आहे.. आतापर्यंत हा विषय समोर आला नव्हता. त्यामुळेच ही कथा चित्रपट रसिकांना चांगलीच भावली, आवडली… वास्तविक हा विषय खरा आहे.. दक्षिणेतील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तचंदनाची तस्करी होत असते.. त्यातून अनेक गुन्हेगारांच्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत..
.. तर या रक्त चंदनाला इतकी मागणी का आहे, त्याचा कशासाठी उपयोग होतो, याबाबत आज सविस्तर जाणून घेऊ या…
रक्तचंदनाचे महत्व..!
पैसे झाडावर उगतात का, असे म्हटले जाते. मात्र, रक्त चंदनाचे झाड.. खऱ्या अर्थाने पैशाचे झाड असल्याचे म्हटले जाते. सोन्यापेक्षाही रक्तचंदनाला जादा किंमत आहे. रक्तचंदनाला परीस म्हटले जाते. ज्याच्या हाती लागले, त्याचे दिवस बदललेच म्हणून समजा…!
रक्तचंदन तीन रंगामध्ये पाहायला मिळते. पांढरे, पिवळे नि लाल. मात्र, लाल चंदनाला इतर दोघांच्या तुलनेत मोठी मागणी असते. त्यामुळे साहजिकच ते महाग असते. पिवळ्या चंदनाचा वापर वैष्णव करतात, तर लाल चंदन शैवपंथी वापरतात. या चंदनाचे वैज्ञानिक भाषेत ‘प्टेरोकार्पस सँटालिनस’ (Pterocarpus Santalinus) म्हटले जाते..
तमिळनाडू नि आंध्रप्रदेश या दोन राज्यांच्या सीमेवर फक्त चार जिल्ह्यांमधील जवळपास पाच लाख हेक्टरवर पसरलेल्या जंगलात हे रक्तचंदन सापडते. नेल्लोर, चित्तूर, कडप्पा आणि कुरनूल येथील शेषाचलम डोंगरावर ते मोठ्या प्रमाणात आहे. ठराविक भागातच ते मिळत असल्याने, त्याची मोठ्या प्रमाणात स्मगलिंग होते.
रक्तचंदनाचे झाड 8 ते 11 मीटरपर्यंत उंच वाढते.. हे झाड हळूहळू वाढत असल्याने, त्याची घनता खूप जास्त असते. त्यामुळेच इतर लाकडांच्या तुलनेत ते लवकर पाण्यात बुडते.
रक्तचंदनाचा वापर..
हिंदू धर्मात रक्त चंदनाला अनन्यसाधारण महत्व आहे. अगरबत्तीपासून तर टिळा लावण्यापर्यंत या लाकडाचा उपयोग होतो.. त्यापासून महाग फर्निचरही बनवले जाते. दारू बनविण्यासाठीही त्याचा वापर होतो. रक्तचंदनामुळे सौंदर्य बहरते, असेही म्हटले जाते. चीन, सिंगापूर, जपानमधून मोठ्या प्रमाणात त्याला मागणी आहे.
रक्तचंदनाच्या व्यापारासाठी लागणाऱ्या बोलीत यूएई, चीन, जपान, तसेच अनेक पाश्चात्य देशांतील शेकडो व्यापारी सहभागी होतात. सहजासहजी ते मिळत नसल्याने त्याची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते.. त्यामुळे या भागात ‘एसटीएफ’ची स्पेशल तुकडी तैनात करण्यात आली आहे.
रक्तचंदनाच्या तस्करीतून तुफान पैसा मिळत असल्याने अनेक सराईत गुन्हेगार तस्करीत सहभागी आहेत. रक्तचंदनाची तस्करी करताना सापडल्यास थेट 11 वर्षे कारावास होऊ शकतो.. मात्र, तरीही कधी जमिनीवर, कधी पाण्यातून, तर कधी थेट आकाशातून चंदनाची तस्करी सुरु असते.