SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तील लोकप्रिय कलाकाराला लुटण्याचा प्रयत्न, मुंबईतील रिक्षाचालकाचा ‘प्रताप’..!

‘सोनी’ मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyjatra) या विनोदी कार्यक्रमाला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यातील कलाकार घराघरात पोचले आहेत. त्यातील एका कलाकाराला मुंबईत नुकतेच एका थरारक प्रसंगाला सामाेरे जावे लागले..

पृथ्विक प्रताप (Prithvik Pratap), असे या कलाकाराचे नाव.. ‘क्लास ऑफ 83’ या क्राईम थ्रिलरमध्ये त्याने चांगले काम केलंय. त्यानंतर आता तो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमात झळकताना दिसतो..

Advertisement

पृथ्विक प्रतापसोबत नुकताच एक थरारक प्रसंग घडला. मुंबईतील रिक्षाचालकाने रात्रीच्या वेळी त्याला चक्क लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, नशीब बलवत्तर असल्याने पोलिस वेळेवर पोचले नि त्याची सुखरुप सुटका झाली.. हा सारा प्रसंग त्याने आपल्या फेसबूक पेजवर मांडला आहे. तसेच मुंबई पोलिसांना धन्यवाद देताना, अशा घटनांपासून सावध राहण्याचा सल्लाही दिला आहे.

Advertisement

नेमकं काय घडलं..?
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचे शुटिंग आटपून 21 जानेवारीला रात्री 9 च्या सुमारास ‘ग्रीन वॅली स्टुडिओज’ (काशिमीरा, मीरारोड) येथून घरी जाण्यासाठी पृथ्विक निघाला. त्या दिवशी त्याने स्वतःची गाडी आणली नसल्याने ‘ओला/उबेर’ बूक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नेटवर्क वीक होते.

शेवटी वैतागून चालत तो स्टुडिओच्या गेटमधून बाहेर पडला व एका रिक्षाचालकाला हात केला. ‘ठाणे..?’ असे विचारताच त्यानेही रिक्षा वळवली. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे वरून त्याने अचानक रिक्षा कांदिवलीच्या दिशेने वळवली. त्यावर पृथ्विकने त्याला आपल्याला ठाण्याला जायचंय, रिक्षा घोडबंदरने घे..’ असे सांगितले..

Advertisement

पृथ्वीकच्या सांगण्यामुळे तो चिडला व ‘इधर से भी जाता है, गाडी ठाणे को..’ असं म्हणत मनाविरुद्ध तडक निघाला. त्यानंतर त्याने घोडबंदरच्या दिशेने जाण्याऐवजी वसईच्या दिशेने रिक्षा वळवली. पृथ्वीकने त्याला ‘घोडबंदर मागे आहे, फाउंटेन हाॅटेलच्या रस्त्याने जायचंय.., असं सांगितलं असता, तो संतापला… ‘मेरे को मत सिखा, किधर क्या है, चुपचाप बैठ..’ असं बोलला.

पृथ्वीकने त्याला रिक्षा थांबविण्यास सांगूनही तो ऐकत नव्हता.. तसाच वसईच्या दिशेने तो जाऊ लागला असता, पृथ्वीकने ‘100’ नंबरवर काॅल केला.. पोलिसांना सगळा प्रकार सांगितला. रिक्षाचा नंबर पोलिसांना सांगत असतानाच, त्याने पुन्हा रिक्षा ‘फाऊंटेन’च्या दिशेने वळवली. ‘पोलीस को क्यू फोन कर रहे, गल्तीसे ये रस्ते पे गाडी डाला मैने..’ असे म्हणत त्याने फाउंटेन हाॅटेलजवळ गाडी थांबवली.

Advertisement

पृथ्वीकने रिक्षातून उतरत, रिक्षाचालकाचा फोटो काढला. त्याच्याकडे आयकार्ड, परमिटची मागणी केली असता, हुज्जत घालत तो म्हणाला, की ‘तू ‘आरटीओ’वाला है क्या? तेरे को क्यू दिखाऊ, पोलिस को क्यू फोन लगाया? मेरी भी पुलिस में पहचान है, 20 साल से है इस धंदे में, बहोत देखे है पुलिसवाले..’ असं तो बोलत होता.

साधारण 10 मिनिटे त्यांच्यात वाद सुरु असतानाच, काही पोलिस तेथे पाेचले. त्यांना पाहताच त्याने तेथून धूम ठोकली. पोलिस वेळेवर हजर झाल्याने पृथ्वीक सुखरुप बचावला. त्याबद्दल त्याने मुंबई पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत.. आतापर्यंत दीडशेहून अधिक जणांनी पृथ्विकची फेसबूक पोस्ट शेअर केली असून, तो सुखरुप असल्याबद्दल दिलासा व्यक्त केलाय.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement